“गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘त्या’ फोनकॉलचा प्रसंग!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यावेळी गुवाहाटीचा कार्यक्रम झाला, त्यामुळेच आजचा कार्यक्रम शक्य होत आहे.

shree shree ravishankar and cm eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री श्री रविशंकर एकाच व्यासपीठावर

आज जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी डाव्होसला गेलो होतो. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले. डाव्होसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करुच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे काम मोठे आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. एकही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा नाही. जनतेसाठीचे सर्व निर्णय घेतले.”

हे वाचा >> मोदी सरकारसाठी गूड न्यूज! जानेवारी महिन्यात बेरोजगारीचा दर घसरला; महाराष्ट्रात मात्र गुजरातपेक्षा…

गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला..

“महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लढाई सुरु केली आहे. ते म्हणाले, “तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळेल.” गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरु केली. त्याचा फायदा राज्याला झाला. दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षांमध्ये ही योजना बंद करण्यात आली. ही एक आदर्श योजना होती. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पहिला निर्णय जलयुक्त शिवार योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. जलतारा प्रकल्पाला देखील आम्ही सरकारतर्फे मदत देऊ आणि ही योजना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

हे देखील वाचा >> मित्राची हत्या करून मृतदेह फेकणाराही तोल जाऊन दरीत पडला; दोघांच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उकललं!

शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही

शेतकरी कर्जमूक्त, चिंतामूक्त होऊन त्याच्या मनातला आत्महत्येचा विचार दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. शेतकरी अन्नदाता असून आम्ही त्याच्यासोबत आहोत. श्री श्री रविशंकर यांनी सुरु केलेल्या जलतारा या जलसंधारणाच्या प्रकल्पाला आम्ही पाठिंबा देऊ. ही एक मोठी चळवळ उभी राहिल. देशातील एक लाख गावांमध्ये हा जलतारा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्याला आपण सर्व मिळून साथ देऊया. शेती आणि शेतकऱ्याला जे जे द्यावे लागेल, त्यासाठी सरकार मागे राहणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:35 IST
Next Story
पुणे: “आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा…!” कोयता गँगचा धुमाकूळ
Exit mobile version