दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी चार आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून तीन खासदार लवकरच शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचा दावा केल्याचं वृत्त ‘मुंबई तक’ने दिलं आहे. विशेष म्हणजे यात एका मुंबईच्या खासदाराचाही समावेश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> थंड पाण्याची बाटली, लोणावळ्यातील हॉटेल अन् थेट CM शिंदेंच्या हत्येचा कट रचल्याचा फोन; ‘त्या’ कॉलमागील खरा घटनाक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाण्यातील दोन आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हलपट्टी करण्यात आली. शिंदे गटात सामील झाल्याने पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली. शिवसेनेनं कारवाई केल्यानंतर आता प्रतापराव जाधव यांनी शिवसेनाविरोधी भूमिका घेत आणखीन आमदार आणि खासदार फुटणार असल्याचं भाष्य केलं आहे. “१८ पैकी १२ खासदार शिंदे गटात आले आहेत. इतर काही खासदार तुमच्या संपर्कात आहेत का?” असा प्रश्न जाधव यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना जाधव यांनी, “शंभर टक्के” असं म्हणत उत्तर दिलं.

“काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडे असलेल्या १५ आमदारांपैकी काही आमदार वेगवेगळ्या लोकांच्या तसेच एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. याचं उदाहरण सांगायचं झाल्यास, उद्धव ठाकरेंनी गटनेत्यांचा मेळावा घेतला त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरुन लक्षात आलं असेल. त्यांनी हेच म्हटलं होतं की शिवसेना-भाजपाचीच युती असली पाहिजे कारण ही नैसर्गिक युती आहे,” असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘काल रात्री या…’; शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांनी शेअर केले फोटो

यानंतर ‘किती खासदार संपर्कात आहेत?’ असा प्रश्न जाधव यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना जाधव यांनी, “आज तर नाही पण ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील तेव्हा त्यातील तीन ते चार खासदार (आमच्याकडे येतील.) निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. धनुष्यबाण आम्हाला १०० टक्के मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमचा दावा तितका मजबूत आहे. तितके पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत. धनुष्यबाण आमच्याकडे आला तर तिकडं काहीच शिल्लक राहणार नाही एवढी गोष्ट नक्की आहे,” असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde supporter prataprao jadhav says 3 mp and 4 mla from thackeray group to join shinde soon scsg
First published on: 03-10-2022 at 11:33 IST