राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, जनावरांना चारा-पाणी, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना कर्ज अशा सर्वच बाबतीत लागेल ती मदत सरकारकडून दिली जाईल. सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास बाळगा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले. मराठवाडय़ाचा दुष्काळ पाहणी दौरा पूर्ण केल्यानंतर नव्याने स्थितीचा आढावा घेऊन आणखी शेतकरी उपयोगी निर्णय घेतले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मंगळवारी दुपारी फडणवीस खास विमानाने लातुरात आले. पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व सुधाकर भालेराव, मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय त्यांच्या समवेत होते. येरोळ, निटूर, गौर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. गौर येथे बाजेवर घोंगडी टाकून त्यांच्या बसण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी केली होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की लातूरमधील शेतकरी अतिशय अडचणीत असल्याची आपल्याला जाणीव आहे, त्यामुळेच संपूर्ण सरकार सोबत घेऊन आपले प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी मी आपल्या भेटीस आलो आहे. गेल्या ३ वर्षांपासून तुम्ही अडचणीत आहात. पाऊस नाही, पेरणी नाही, पेरले तर उगवले नाही अशी स्थिती आहे. या अडचणी सोडवण्यास सरकार कटिबद्ध आहे. सर्व दुष्काळी भागाच्या समस्यांचे तालुकानिहाय निराकरण करण्यास आराखडा तयार केला आहे. टँकरने पाणी पुरवण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनावरांना चारा छावणी उपलब्ध केली जाईल. चारा छावणी चालवण्यास अटी शिथिल केल्या आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांच्या दावणीला चारा देता येईल का? चारा डेपो सुरू करता येईल का? याचाही विचार केला जात असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अडचणीत हात देण्यासाठी सरकारच्या वतीने २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जाणार आहे. तो सरसकट सर्वाना मिळावा, या साठी नियोजन केले जात आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्हय़ाच्या धर्तीवर शेततळय़ांची कामे देण्यात येतील. मराठवाडय़ाचा दौरा पूर्ण केल्यानंतर नव्याने आढावा घेऊन आणखी शेतकरी उपयोगी निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने सुरुवातीला शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. तुकाराम येलाले यांनी शेततळय़ांच्या अटी शिथिल करण्याची विनंती केली. तुपडी येथे चारा छावणीचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ठिकठिकाणी शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.