कराड दक्षिणच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांचे कुटुंब सक्रिय

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे राहुल व इंद्रजित कराड दक्षिण मतदारसंघाच्या प्रचारात सक्रिय असताना, आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला या आपल्या दोन सुनांसह प्रचारात उतरल्याने मुख्यमंत्र्यांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे राहुल व इंद्रजित कराड दक्षिण मतदारसंघाच्या प्रचारात सक्रिय असताना, आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्त्वशीला या आपल्या दोन सुनांसह प्रचारात उतरल्याने मुख्यमंत्र्यांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे. जुन्या, नव्या अशा सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांसह प्रत्येक निधर्मवादी पक्षसंघटनेचा भक्कम पाठिंबा मिळवण्यासाठी चव्हाण कुटुंबीय प्राधान्याने कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधला जावा अशी योजनाही त्यांच्या विचाराधीन आहे.
येथील शुक्रवार पेठेत काल महिला मेळाव्यात सत्त्वशीला चव्हाण, राजकुंवर चव्हाण,  गौरी चव्हाण, आशा चव्हाण या चव्हाण कुटुंबातील सदस्या उपस्थित होत्या. ज्येष्ठ नगरसेविका व माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. कराड पालिकेतील विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, नगरसेविका अरुणा शिंदे, मीनाक्षी जाधव, संगीता मोरे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
सत्त्वशीला चव्हाण म्हणाल्या की, पृथ्वीराजबाबांशी विवाह झाल्यानंतर मी कराडला आल्यापासून कराडकर जनतेशी आपले जिव्हाळय़ाचे नाते आहे. पृथ्वीराजबाबांची खासदारकी, केंद्रीय मंत्री अन् आता मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आम्ही दिल्ली, मुंबई येथे राहिलो असलो तरी कराडच्या जनतेच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले गेले. कराड प्रगत शहर व्हावे असा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. त्या दृष्टीने अभ्यास करून, कोटय़वधी रुपयांचा निधीही दिला गेला आहे. महिलांना राजकारण व समाजकारणात सन्मानाचे स्थान राहावे अशी त्यांची भूमिका आहे.
पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर कराडच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. तरी, कराडच्या विकासाचा वेग कायम राहावा यासाठी जनतेने पृथ्वीराजबाबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
शारदाताई म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी शहराची हद्दवाढ केली. नगरपालिकेला चांगला निधी देऊ केला. कराड दक्षिणचा कायापालट करण्याची त्यांची योजना आहे. तरी, अशा अभ्यासू, कर्तव्यदक्ष व निष्कलंक नेतृत्वाच्या पाठीशी सर्वानी ठाम उभे राहिले पाहिजे.  कार्यक्रमाला विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव, माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर यांची उपस्थिती होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm prithviraj chavan family readiness for south karad seat

ताज्या बातम्या