मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये संतपीठ सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

cm uddhav thackeray in marathwada muktisangram din aurangabad
उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये मोठी घोषणा!

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावं अशी चर्चा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. त्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल. संतांची शिकवण म्हणजे काय? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत. हे आज संतपीठ होतंय, ते विद्यापीठ झालं पाहिजे. जगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

१५० निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार

“निजामशाहीच्या काही खुणा आहेत. निजामशाहीच्या काळातल्या शाळा आता पडायला आलेल्या आहेत. ही काही वैभवशाली परंपरा नाही. म्हणून मराठवाड्यातल्या सुमारे १५० शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत. आम्हाला त्या शाळा नको आहेत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत. मराठवाड्यातल्या शाळांचं रुप अभिमान वाटला पाहिजे, असं करणार आहोत”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

परभणीमध्ये शासकीय महाविद्यालयाची घोषणा

“सध्या आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. काहीजण असं म्हणतील की मुख्यमंत्री आले, इतकी कामं जाहीर केली, पण पुढे काय होणार? पुढे त्याचा शुभारंभ झाल्यावर त्याचं लोकार्पण होणार. आज ज्या काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याच मी जाहीर करतोय. पण इतर मोठे विषय देखील आपण मार्गी लावत आहोत. संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना कित्येक वर्ष आपण फक्त बोलत होतो. अनेकजण आले आणि बोलून गेले. शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि संभाजीनगरचं वेगळं नातं आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्याला दिलेली वचनं जनतेच्या भल्यासाठी होती आणि ती पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या इतर घोषणा!

१.   हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी

२.   औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना

३.   औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी

४.   सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये

५. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून

६. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५०  कोटी रुपयांची तरतूद

७. परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. १०५ कोटी रुपये

८. उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना

९. औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश

१०. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी

११. औरंगाबाद – शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ

१२. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार

१३. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार

१४. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार

१५. मराठवाड्यात येत्या  वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार

१६. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश

१७. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च

१८. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास. 86.19 कोटी रुपये खर्च येईल.

१९. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm uddhav thackeray announces sant peeth on marathwada miktisangram din in aurangabad pmw

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या