राजकारण्याला घर पेटवणं सोपं, पण घरातली चूल पेटवणं कठीण आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी उद्योगाबरोबरच कृषी क्षेत्रही आपलं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. औरंगाबादमध्ये ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’चे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. “आपल्या उद्योजकांमध्ये बळ आहे. देशाचं लक्ष वेधेल असं हे एक्स्पो आहे. उद्योजकांना खंबीर करणारं हे सरकार असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय एक्स्पो करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

“उद्योजकांसमोर अनेक अडचणी आहेत. अडचणींचा सामना करून उद्योजकांनी मोठं विश्व उभं केलं आहे. जर त्यांच्यासमोरील अडचणी दूर केल्या तर उद्योजक आणखी मोठं विश्व उभारू शकतील,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्ही संकटावर मात करून हे सरकार उभं केलं आहे. उद्योजकांना प्रेरणा देणारं हे सरकार असेल. देशात, जगात, देशात आर्थिक मंदी आहे म्हणून रडत बसलो तर आपण लढू शकणार नाही आणि रडणारे तसं नीट जगूही शकणार नाही. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “शेतकरी हा एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत असतो. आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कर्जमुक्तीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्तही करणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “आपण करत असलेले प्रयोग कधी यशस्वी होतात, तर कधी फसतात. त्यामुळे आपण प्रयोग करणं सोडायचं नाही. शेती आणि उद्योग खातं एकत्र मिळून काम करेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारला सूचना पाठवा
“उद्योजकांच्या काही सूचना असतील तर त्या त्यांनी सरकारलाल पाठवाव्यात. राज्यात विकासाचा दिवा पेटला पाहिजे. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ, तुम्ही भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. “देशाला महाशक्ती बनवताना शक्ती देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करेल,” असंही त्यांनी नमूद केलं.