“राजकारण आपलं होतं मात्र जीव जनतेचा जातो”, उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

आंदोलन करा पण करोनाविरुद्ध करा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तसंच उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन विरोधी पक्षांना सुनावलं आहे. ते म्हणाले, अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको.

राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आता सणवाराचे दिवस सुरु. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm uddhav thackeray in maza doctor council about covid 19 vsk