शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री यांनी नुकताच नगरसेवकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाला हिंदुत्वाच्या व्होट बँकेत भागीदार नको आहे, त्यामुळे ते शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. हा त्यांचा डाव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना आणि भाजपासोबतच्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाहीये, शिवसेना हा एक विचार आहे. हा विचार भाजपा संपवायला निघाला आहे. त्यांचा हा डाव आहे. हिंदुत्वाच्या व्होट बँकेत त्यांना दुसरा भागीदार नको आहे. जो-जो हिंदुत्वाबाबत बोलेलं तो त्यांचा शत्रू आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात भाजपा-शिवसेनेला काहीच नव्हते, हिंदू म्हणून लोक एकमेकांना जवळ करायला तयार नव्हतं. तेव्हा हिंदू मतांची विभागणी होऊ नये, म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आज त्या युतीची फळं आपल्याला चाखायला मिळतायत, हे आपलं भाग्य आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली म्हणून भाजपाचे लोक हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारत आहेत. पण त्यांनी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. सत्तेसाठी त्यांनी काहीही केलेलं चालतं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.

नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “शिवसेनेसोबत कुणीच राहिलं नाही, असं चित्र रंगवलं जात आहे. पण तुम्हाला पाहून आनंद झाला. मी आता तुमच्या साथीनं महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. मी आधीच म्हटलं होतं, शिवसेना ही मर्दाची सेना आहे. आपल्यावर जेव्हा- जेव्हा कठीण प्रसंग आले. त्यावेळी ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं. त्या सर्व पोकळ आव्हानवीरांना आपण राजकारणात संपवून पुढे गेलो आहोत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी सांगितलं होतं की, आज परत सांगतो, शिवसेनेत गद्दारांची अवलाद नको. पण ती पुन्हा एकदा समोर आली आहे.”