“जेव्हा प्रमोद महाजन म्हणायचे, शहाणा झालास का?”, उद्धव ठाकरे यांनी जागवल्या रम्य आठवणी…

लोकसत्तेच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेचा आज समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्तेच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आगामी वाटचालीसंदर्भात भूमिका मांडली. तसेच युतीच्या जुन्या आठवणींना उजाळाही दिला. त्यांनी भाजपा आणि शिवसेना युतीतील नेत्यांचे संबंध अधोरेखित केले. तसेच युतीचा तेव्हाचा काळ सूवर्णकाळ होता असंही सांगायला विसरले नाहीत. २५ ते ३० वर्षे आम्ही विश्वासाने राजकारण केलं. विरोधी पक्षात असूनही आम्ही एकत्र होतो. मात्र जेव्हा चांगले दिवस आले आणि युती तुटली, हे दुर्दैव आहे, असं सांगताना त्यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधांना उजाळा दिला.

“प्रमोद महाजन आणि माझं एक वेगळं नातं होतं. आम्ही एकमेकांसोबत भांडायचो म्हणा, वाद व्हायचे. काही काही दिवस आम्ही बोलायचो नाही. मग नंतर कधीतरी भेट झाली की, ते पण थोडे वेगळे वागायचे. आणि म्हणायचे काय रे जास्त शहाणा झालास का?, आणि मग काय, आमचं मौन सुटायचं. नंतर आम्ही पुन्हा एकत्र व्हायचो. हे नातं होतं. मी त्यांना मोठ्या भावासारखं मानायचो. वयाचं भान ठेवून त्यांच्याशी बोलायचो. वाद घालण्यासाठी मोकळेपणा होता.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं.

मराठा आरक्षण : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलोय म्हणून मला आरोप करणं शोभणारं नाही -उद्धव ठाकरे

…म्हणून युती सडली

“शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावादी पक्ष एकत्र आले पाहीजेत ही भूमिका मांडली. तेव्हा प्रमोद महाजन आले. त्यांनी भाजपाला सोबत आणलं. आम्ही विरोधी पक्षात होतो तरी युतीचा सूवर्णकाळ होता. एकमेकांशी मोकळेपणाने बोललं जात होतं. कुठेही पाठीमागून राजकारण करण्याचे दिवस नव्हते. एकमेकांवर विश्वास ठेवून पुढे जात होतो. अमूक एक जागा पाहीजे भगवा फडकवणार का? शिवसेनाप्रमुख बोलायचे जा दिली. शिवसेना की भाजपा, भगवा फडकवशील की दिली जागा…भगवा हा समान विचार होता. आता थोडसं बुद्धीबळ आलं आहे. तेव्हा तसं नव्हतं. तो सूवर्णकाळ होता. ते विचार रुजले. अनेकांनी तुरुंवाग भोगला, काही जणांनी बलिदान दिलं. जेव्हा त्याचं वटवृक्षात रुपांतर झालं तेव्हा काही विचारांमुळे दुर्दैवाने युती तुटली. तेव्हा मला वाटलं त्या विचारांचं आयुष्य सडलं.” असंही त्यांनी या मुलाखती दरम्यान सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm uddhav thackeray on bjp leader pramod mahajan rmt