राज्यात एकीकडे राजकीय वर्तुळामध्ये मोठी उलथापालथ होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विचाराधीन होता. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. मात्र, यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवल्यानंतर अखेर उद्धव ठाकरेंनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याची माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार असल्याचं सांगितलं आहे.

“भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आहे. आम्ही अनेकदा विनंती केली होती, पत्र पाठवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व समाजाच्या लोकांना मातोश्रीवर बोलवलं आणि तुमची जी इच्छा आहे, भावना आहेत, त्यांचा सन्मान राखून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं निश्चित केलं”, अशी माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्ताने टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे.

Maharashtra Political Crisis Live : गुवाहाटीतील हॉटेलबाहेरून एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…!

एकनाथ शिंदेंचं ‘ते’ पत्र!

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी हे विमानतळ बांधलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला. डिसेंबर २०२०मध्ये राज्याचे नगरविकास मंत्री आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या बंडाळीच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीच सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात CIDCO ला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं, असा प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली होती.

कोण होते दि. बा. पाटील?

दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचा जन्म रायगडच्या उरण तालुक्यातल्या जसई गावात झाला. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या दि. बा. पाटील यांनी १९५१मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पीझंट्स वर्कर्स पार्टीशी ते संबंधित होते. १९५७ ते १९८० या काळात ते पाच वेळी पनवेलमधून आमदार म्हणून निवडून गेले होते. १९७७ ते १९८४ या काळात ते खासदार देखील होते. १९७२ ते १९७७ आणि १९८२-८३ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray on navi mumbai internation airport d b patil name pmw
First published on: 28-06-2022 at 14:48 IST