scorecardresearch

“तिथे युद्धात रशियाविरुद्ध युक्रेनच्या महिला…”, मुख्यमंत्र्यांनी केलं ‘फायटिंग स्पिरिट’चं कौतुक!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी महिला पोलिसांसाठी घेतलेल्या निर्णयाचा देखील उल्लेख केला.

cm uddhav thackeray internation womens day ukraine war
उद्धव ठाकरेंनी युक्रेनच्या महिलांचं केलं कौतुक!

आंतरराष्ट्रीय मगिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारतर्फे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी रशिया-युक्रेन युद्धात सहभागी झालेल्या महिलांचं कौतुक केलं. तसेच, महिलांसाठी काम करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“ही काही छोटी गोष्ट नाही”

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा उल्लेख केला. रशियानं युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर युक्रेनमधील अनेक महिला देखील युद्धात सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. तिथल्या महिला बंदुका घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या घर देखील सांभाळतात आणि देश देखील सांभाळतात. ही झेप ही काही लहान गोष्ट नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाल्या.

मुंबईतल्या महिला पोलिसांसाठी दिलासा

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचं देखील कौतुक केलं. “मुंबई पोलीस आयुक्तांनी महिला पोलिसांचे कामाचे तास ८ तास केले आहेत. महिलांना कुटुंब, घर-दार याकडे लक्ष द्यावंच लागतं. महिला पोलिसांना रक्षाबंधन, गुढीपाडवा, दिवाळी याची तमा न बाळगता ती कामावर हजर राहाते. फक्त फायली क्लीअर करायचं वगैरे काम नाही, तर बंदोबस्तावर असते. करोनाच्या कठीण परिस्थितीत देखील त्यांनी काम केलं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“समाजाला संस्कार देण्याचं काम माता करते”

“महिला म्हणजे काय? तर चूल आणि मूल.. आपण सगळे कधीतरी मूल होतो. आपल्या सगळ्यांचं संगोपन आपली आई करत असते. समाजाला संस्कार देण्याचं काम एक माता करत असते. छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त होते. त्यांच्यावर जिजाऊंनी संस्कार केले होते म्हणून आपण हा काळ बघू शकतो आहोत. आता चूल आणि मूलच्या पुढे जाऊन महिला पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकत आहेत. राज्यकर्ते महिलांसाठी काय करतात, हे महत्त्वाचं आहे”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“कोरोनाच्या संकट काळात, अत्यंत कठीण परिस्थितीत महिला पोलीसांनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस  यांनी खूप उत्तम काम केले. चिमुकल्यांना घरी ठेऊन कोरोना काळात या महिला कामावर गेल्या आहेत. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray praised ukrainian woman fighting against russia in war pmw