उद्धव ठाकरे म्हणतात, “नितीनजी, तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर…”!

नागपूरमध्ये गडकरींच्या उपस्थितीत रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

uddhav thackeray on nitin gadkari
उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचं कौतुक करताना केलं विधान!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वच पक्षीयांसोबत मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्राच शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये काडीमोड झालेला असताना देखील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील नेतेमंडळींशी नितीन गडकरींच्या भेटीगाठी, चर्चा किंवा अनौपचारिक सल्लामसलत होतच असते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवाय, युतीचं सरकार महाराष्ट्रात आल्याच्या आठवणींना देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी उजाळा दिला आहे.

“मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार..”

नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या कामाचं आणि त्यांच्या स्वभावाचं उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं. “नितीनजी, मी उगीच तुमचं कौतुक करत नाही. पण मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं. तुम्ही ही शहरं जोडली. आता तर अंतर कमी करून तुम्ही ती अजून जवळ आणत आहात”, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मानले नितीन गडकरींचे आभार; कारण…

“स्वप्न पाहायलाही धाडस लागतं”

“स्वप्न पाहायलाही धाडस लागतं आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी जर दुसरा कुणी असता, तर म्हटला असता बघतो मी जरा, कसं शक्य आहे, काय होऊ शकतं, कसं होईल. पण तुम्ही तात्काळ सांगितलं मी करतो आणि करून दाखवलंत. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे. तुमची पुढची वाटचाल आत्ता तुम्ही ज्या गतीने करता आहात, त्याच गतीने व्हावी, अशा मी शुभेच्छा देतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

गडकरींचं महाराष्ट्र प्रेम! म्हणाले, “मी दिल्लीत चुकून आलो!”

आपल्या महाराष्ट्र प्रेमावर किंवा मराठी प्रेमावर नितीन गडकरी नेहमीच बोलताना दिसून आले आहेत. नुकतंच एका कार्यक्रमात त्यांनी आपण दिल्लीत चुकून आल्याचं म्हटलं होतं. “दिल्लीमध्ये मी अपघाताने आलो. मी येण्यासाठी तयार नव्हतो. जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी संस्कृती. मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी इतिहास हा एकदम वेगळा आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण मराठी सारस्वाताचा आणि महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र औद्योगिक तसंच साहित्य, संस्कृती, इतिहास या सर्व गोष्टींमध्ये पुढे आहे. संगीत, गाणं, चित्रपट सगळ्या बाबतीत मराठी माणसाचा दबबबा आहे. महाराष्ट्र अजून सुखी, समृद्ध. संपन्न, शक्तिशाली व्हावा, फक्त साधनांनी नाही तर साहित्य, संस्कृती, कला यांनीदेखल व्हावा असं स्वप्न आहे,” असं नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm uddhav thackeray praises central minister nitin gadkari in nagpur program pmw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी