संभाव्य तिसऱ्या लाटेचाही मुकाबला करू या – ठाकरे

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून करोनाविषयक आढावा

येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोनाबाबत बैठक घेतली. या वेळी पालकमंत्री भरणे व जिल्ह्यातील अधिकारी.

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून करोनाविषयक आढावा

पंढरपूर : करोना महामारीच्या साथीत आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून करोनाचा मुकाबला करू या, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केली.

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झाले, सलग ८ तास प्रवास करून आल्या नंतर लगेच शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबधितांना त्यांनी या सूचना केल्या. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील करोना परिस्थिती, प्राणवायू, लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. त्या नंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे.

प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल. अर्थचक्र थांबू नये म्हणून करोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. तसेच खासगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा.

सोलापूरच्या पाण्याचा विषय मार्गी लावणार

पालकमंत्री भरणे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठय़ासाठी उजनी दुहेरी पाइपलाइनसाठी अजून १०३ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तसेच महिनाभरात करोना रुग्ण नसणाऱ्या गावात ६ वी ते १२ वीचे वर्ग सुरू केल्याची माहिती जि. प. कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिली. करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी झाडाखाली, पारावर शाळा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm uddhav thackeray review meeting over corona in pandharpur zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या