‘बडे बडे शहरों मे ऐसी छोटी छोटी बाते होती ही रहती है’, हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही जरुर ऐकला असेल. पण आजचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधान तुम्ही ऐकलंत तरी ‘बडे बडे “भाषण” में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’, असंच तुम्हीही म्हणाल. कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भर सभेत माफी मागितली. नक्की काय घडलं?

निमित्त होतं पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाच्या भूमीपूजनाचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. रुढ पद्धतीप्रमाणे त्यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्वांना नमस्कार केला आणि तितक्यात आपल्याला देवेंद्र फडणवीसांचा विसर पडल्याचं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं.

त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांची माफी मागत त्यांनाही नमस्कार केला. ते म्हणाले, “देवेंद्रजी, सॉरी, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आणि आमचे सहकारी देवेंद्रजी” आणि यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

हेही वाचा – “महाराष्ट्र प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत” ; मुख्यमंत्र्यांचे नितीन गडकरींना आश्वासन

या कार्यक्रमास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी यांनी पुण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्र सरकारकडून काही अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत. पालखीमार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. उन वारा पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो.”