शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना CJP च्या आंदोलनानंतर राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय मंत्रिमंडळात आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात हा पहिला राजीनामा ठरला. सध्या प्रधान यांच्या खात्याची अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशी यांना देण्यात आली आहे. हे खातं कुणाला देण्यात येणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी दोनवेळा हा दावा केला की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षण मंत्री हे पद दिलं जाईल. कुणी कितीही दावे केले तरी माझ्याकडे ही पक्की माहिती असल्याचं ते म्हणाले होते. याबाबत आता मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाल्या?
देवेंद्रजी महाराष्ट्राची सेवा करत आहेत. महाराष्ट्राचे सेवक आहेत. ती जबाबदारी ते नीट निभावत आहेत याचा मला आनंद आहे. बाकी खूपदा शुभचिंतक काही काही बोलून जातात. पण महाराष्ट्र ती जागा आहे जी देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी आहे, इथे त्यांनी छान काम करावं. देवेंद्रजींना दिल्लीत बघायला आवडेल का? हे विचारलं असता अमृता फडणवीस यांनी नाही, नाही आवडणार कारण मी महाराष्ट्राची मुलगी आहे असं उत्तर दिलं आहे.
सुनेत्रा पवारांवरच्या टीकेवरही भाष्य
अमृता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने जी टीका केली त्यावरही उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, “अशा पद्धतीने काँग्रेसने असं म्हणणं हे दुर्दैवी आहे. या प्रकारे एका स्त्रीला हिणवलं जाणं हे चांगलं नाही. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. यात आम्ही हे सहन करु शकत नाही. काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. विरोधी पक्षात स्टंटबाज लोक खूप आहेत. कोण खरे मुद्दे मांडतंय आणि कोण स्टंट करतंय हे समजून घ्या” असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचीही काँग्रेसवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत.
