Mumbai CNG Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असताना तुलनेने वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय असलेल्या ‘सीएनजी’च्या किमतीतही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. तर घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) च्या दरात प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरला (एससीएम) ५० पैसे इतकी वाढ केली आहे.
१५ दिवसांतील ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी १४ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच दुसरी वाढ झाली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर प्रति किलो ८४ रुपयांवरून ८६ रुपयांवर पोहोचला आहे. तर पीएनजीचे दर प्रति एससीएम ५२ रुपये झाले आहेत.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कंपनीला इतर स्रोतावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत आहे. यामुळे आयातीपोटी अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्याचा परिणाम म्हणून दरवाढ केली जात आहे.
पेट्रोल-डिझेलचा दर किती?
अमेरिका-इराण-इस्रायल युद्धानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. याचा परिणाम भारतावर जाणवत आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.२१ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९७.८३ रुपये इतका आहे.
रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार?
मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे १२.८ लाख वाहने सीएनजीवर धावतात. यामध्ये ४.७० लाख रिक्षा, १.६० लाख टॅक्सी आणि ५ लाखांहून अधिक खासगी कारचा समावेश आहे. या दरवाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी युनियनने भाडेवाढीची मागणी लावून धरली आहे. युनियन नेत्यांच्या मते, या वाढीमुळे रिक्षा चालवण्याचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे १ रुपयाने वाढणार आहे. परिणामी, रिक्षा-टॅक्सीच्या मूळ भाड्यात किमान १ रुपयाची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मध्यपूर्वेतील तणावानंतर परिस्थिती चिघळली
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला. प्रत्युत्तरादाखल इराणने अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या शेजारी देशांवर हल्ले केले. तसेच जगाला कच्चे तेल आणि एलएनजीचा पुरवठा करणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध लादले. यामुळे भारतासह जागतिक स्तरावर ऊर्जा संकट ओढवले.
