नीट पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठं यश आलं. यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आणखी महत्वाची घोषणा करत आगामी सामाजिक प्रवासाची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे.

देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी एक भक्कम ‘दबाव गट’ म्हणून सक्रिय राहण्याचा निर्णय ‘सीजेपी’ने घेतला. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ‘क्या बोलती पब्लिक’ या विशेष देशव्यापी मोहिमेची घोषणा देखील करण्यात आली. यानंतर आता अभिजित दिपके यांच्याकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अभिजित दिपके यांची ‘सीजेपी’च्या राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आणखी १२ जणांवर महत्वाची जबाबदारी सोपवत आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली आहे. सौरव दास आणि आशुतोष रंका हे सह-संयोजक, तर अजिंक्य शिंदे संघटनेचे प्रभारी, तर दीपक बलियान यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या संदर्भातील सविस्तर माहिती ‘सीजेपी’च्या सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आली आहे.

कार्यकारी समितीत कोणाचा सहभाग?

संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक : अभिजीत दिपके
सह संयोजक : आशुतोष रांका, सौरव दास
राष्ट्रीय संघटन प्रभारी : अजिंक्य शिंदे
संघटन सहप्रभारी : दीपक बालियान
राष्ट्रीय सचिव : अफरीन नवाज
मीडिया प्रमुख : विजय रेड्डी मल्लांगी
कायदेशीर प्रमुख : रत्ना सिंग
रिसर्च अँड पॉलिसी प्रमुख : वैष्णवी गौर
तंत्रज्ञान प्रमुख : रोहन देशपांडे
वित्त प्रमुख : योगेश इंगळे

विभागीय प्रभारी पदाची जबाबदारी कोणावर?

उत्तर विभाग : दीपक बलियान
दक्षिण विभाग : विजय रेड्डी मल्लांगी
पूर्व- ईशान्य विभाग : अंकित भारद्वाज
पश्चिम विभाग : योगेश इंगळे

दरम्यान, “आमचा कृती आराखडा (रोडमॅप) अंमलात आणण्यासाठी आज सीजेपीच्या कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत सीजेपीच्या देशभरात राज्य समन्वय समित्या तसेच लोकसभा आणि शहर-स्तरीय समन्वय गट स्थापन केले जातील. या बरोबरच आज जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणालाही सीजेपीने पदाधिकारी म्हणून नियुक्त केलेलं नाही”, असं सीजेपीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेची घोषणा

अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आगामी ‘क्या बोलती पब्लिक’ या विशेष देशव्यापी मोहिमेची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यापासून ही व्यापक मोहीम महाराष्ट्रभर आणि देशभरात राबवली जाणार आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेच्या केंद्रस्थानी देशातील बिघडलेली शिक्षण व्यवस्था आणि अवाक्याबाहेर गेलेलं शिक्षण शुल्क यासह आदी मुद्दे असतील. सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून काम करण्याचा निर्धार दिपके यांनी यावेळी व्यक्त केला.