Cockroach Janata Party Sambhajinagar Meeting: कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता पुढे संघटनेची वाटचाल कशी असेल? याबाबत मंथन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रांका आणि इतर सहकारी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी पोहोचले असून शहरात त्यांची बैठक होणार आहे.
मंगळवारी कॉक्रोच जनता पार्टीची टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सीजेपी यापुढेही पारंपरिक राजकारणाला फाटा देत दबावगट म्हणून कार्यरत राहील, अशी भूमिका प्रवक्ते सौरव दास यांनी व्यक्त केली.
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका टिप्पणीवर केलेल्या उपरोधिक पोस्टनंतर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. त्यानंतर झालेल्या नीट पेपरफुटीविरोधात सीजेपीने आंदोलन पुकारले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी सीजेपीने जंतर-मंतरवर ३६ दिवस आंदोलन पुकारले होते. २५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
जेन-झींना त्यांच्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या भवितव्याबाबत आता चर्चा सुरू आहे. अभिजीत दिपके आणि त्यांची टीम राजकारणाचा पर्याय स्वीकारणार की फक्त दबावगट म्हणून काम करणार? असे प्रश्न विचारले जात होते. यावर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी उत्तर दिले आहे.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | On Cockroach Janta Party Core Committee Meeting, party Chief Spokesperson Saurav Das says, "We were asked questions about where this movement will go after the success of the protest, and we have all come to strategise around the… pic.twitter.com/VhNbKoJaDI
— ANI (@ANI) August 4, 2026
काय म्हणाले सौरव दास?
“युवकांचा ऐतिहासिक असा विजय काही दिवसांपूर्वी मिळाला. यानंतर ही चळवळ कुठे जाणार? यावरच चिंतन करण्यासाठी आमची दोन दिवसांची बैठक होणार आहे. ही चळवळ आणखी कशी फोफावेल याचा विचार आम्हाला करायचा आहे. आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. जे पाठिंबा देत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावरच बैठकीत आमची चर्चा होईल”, अशी प्रतिक्रिया सौरव दास यांनी दिली.
राजकीय पक्ष काढण्याचा विचार नाही
सीजेपी राजकीय पक्ष होईल, अशी चर्चा होती. यावरही सौरव दास यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “या देशात दबावगट असणे खूप गरजेचे आहे. या देशात ७०० ते ८०० राजकीय पक्ष आहेत. तरीही लोकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. याचा अर्थ राजकीय पक्ष काढणे, हे त्या समस्यांचे उत्तर नाही. तर समाजात जागृतीची आणि एका चळवळीची गरज आहे आणि तेच कॉक्रोच जनता पार्टी करण्याचा प्रयत्न करत आहे.”
VIDEO | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: On the CJP Core Committee meeting, CJP chief Abhijeet Dipke says, "Our core team members, including our spokespersons and everyone who helped us manage the protest, will be attending. All our core members will be here… As of now,… pic.twitter.com/zGf6wEtvqX
— Press Trust of India (@PTI_News) August 4, 2026
अभिजीत दिपके यांनीही महाराष्ट्रातील माध्यमांशी बोलत असताना राजकारणात उतरण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. सीजेपी यापुढे जेन-झींचे विषय मांडत राहील, असे ते म्हणाले होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत अभिजीत दिपके म्हणाले, आजच्या बैठकीत आमचे प्रवक्ते, तसेच ज्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलन हाताळले ते कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. संघटना वाढवून चळवळ तळागळात कशी न्यावी, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल.
