Cockroach Janta Party : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. ‘काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात’, असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं होतं. त्यांनी तरुणांबाबत केलेल्या या वक्तव्याच्या निषेध म्हणून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) ही व्यंगात्मक राजकीय चळवळ उदयास आली आहे.

‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही चळवळ अभिजीत दिपके यांनी सुरू केली आहे. या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला अवघ्या ३ ते ४ दिवसांत सोशल मीडियावर कोट्यवधि लोकांनी फॉलो केलं असून सध्या संपूर्ण देशभरात आणि सोशल मीडियावर फक्त कॉक्रोच जनता पार्टीचीच चर्चा सुरू आहे. आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’चं राजकीय पक्षात रुपांतर होणार का? कॉक्रोच जनता पार्टी भविष्यात निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? कॉक्रोच जनता पार्टीची कल्पना अभिजीत दिपके यांना नेमकं कशी सुचली? अशा विविध प्रश्नांवर अभिजीत दीपके यांनी भाष्य केलं आहे. तसेच कॉक्रोच जनता पार्टीचा पुढील प्लॅन काय असेल? यावर अभिजीत दिपके यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सविस्तर भाष्य केलं आहे.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

‘कॉक्रोच जनता पार्टी’चं एका चळवळीत रुपांतर होताना दिसत आहे. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रुपांतर होणार का? असा प्रश्न अभिजीत दिपके यांना विचारला. यावर बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, “नक्कीच होईल. पण आत्ता त्याबाबत ठामपणे सांगणं थोडं अवघड आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे की ही कॉक्रोच जनता पार्टी आम्ही कोणतंही नियोजन करून सुरू केलेली नव्हती. जर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ते वक्तव्य केलं नसतं, तर आज कदाचित हे घडलंही नसतं”, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

“आम्ही असा कोणताही प्लॅन करून काही केलं नव्हतं. पण अवघ्या ३ ते ४ दिवसांत १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला फॉलो केलं आहे. त्यामुळे एवढ्या लोकांशी बोलून पुढील नियोजन करणं खूप अवघड आहे. तरीही आम्ही या लोकांशी बोलणार आहोत, लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत, लोकांची मतं काय आहेत? हे जाणून घेऊ. लोकांचा सध्याच्या व्यवस्थेवर आणि सरकारवर एवढा राग का आहे? यांची कारणं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जोपर्यंत लोकांच्या भावना आम्ही जाणून घेत नाहीत, तोपर्यंत पुढील काही नियोजन आम्हाला करता येणार नाही”, असं अभिजीत दिपके यांनी सांगितलं आहे.

“लोकांचं म्हणणं हेच आहे की कोणतंही सरकार आमचं काहीही ऐकायला तयार नाही. आमच्या समस्या काय आहेत हे समजून घ्यायला तयार नाही. त्यामुळे ज्या दुसऱ्या राजकीय पक्षांनी चुका केल्या आहेत, त्याच चुका आम्हाला करायच्या नाहीत. लोकांच्या समस्यांकडे आम्हाला दूर्लक्ष करायचं नाही. लोकांच्या समस्या आणि लोकांच्या भावना काय आहेत? हे आम्ही जाणून घेऊ आणि त्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवू”, असं अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलं आहे.

Cockroach Janta Party Abhijit Dipke

‘कॉक्रोच जनता पार्टी’ कोणी सुरु केली?

‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही डिजिटल चळवळ अभिजीत दिपके (वय ३०) यांनी सुरु केली आहे. अभिजीत दिपके हे पूर्वी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडियाचं काम पाहत होते. आता त्यांच्या या चळवळीला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती, अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काय वक्तव्य केलं होतं?

पीटीआयच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. एका वकिलाने स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कडक शब्दात ताशेरे ओढले.

Cockroach Janta Party Abhijit Dipke

“समाजात अनेक परजीवी वावरत आहेत, ते सातत्याने व्यवस्थेला लक्ष्य करत असतात. तुम्हाला देखील त्यांची हात मिळवायचा आहे का?”, असा थेट सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला विचारला. तसेच, “कदाचित सगळचे जगच वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल. पण, किमान तुम्ही तरी या पदासाठी पात्र नाहीत”, असा शब्दात खंडपीठाने वकिलाला खडसावले. “दिल्ली उच्च न्यायालयाने जरी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली असती तरी तुमचे व्यावसायिक वर्तन पाहता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला असता”, असेही न्यायालयाने पुढे स्पष्ट केले.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी १५ मे रोजी एका सुनावणीवेळी बेरोजगार तरुणांवर टिप्पणी केली. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. काही बेरोजगार तरुण झुरळासारखे आहेत, ज्यांना व्यवसायात काही स्थान नाही. यातील काहीजण माध्यमं होतात, काहीजण समाज माध्यमं होतात, माहिती अधिकार कार्यकर्ते होतात आणि ते सर्वांवर हल्ले करु लागतात, असं सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्टीकरण देत आपण केलेलं वक्तव्य हे बेरोजगार तरुणांबद्दल नसून बनावट पदवीधारकांना उद्देशून होतं, असं सांगितलं होतं.