Abhijeet Dipke Education Background: नीट पेपरफुटीची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलन केले. या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मे महिन्यात भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या टिप्पणीचा आधार घेत इन्स्टाग्रामवर मस्करीत कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली होती. बघता बघता या पार्टीने चळवळीचे रुप घेतले. गेल्या १२ वर्षांत भारतातील विरोधी पक्षांना जे जमले नाही ते अवघ्या ४० दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीने करून दाखवले. अर्थातच यामागे अभिजीत दिपके यांचा प्रमुख चेहरा होता. छत्रपती संभाजीनगरमधून येणाऱ्या अभिजीत दिपकेंची शैक्षणिक कारकिर्द कशी आहे, ते पाहू.
अमेरिकेतील बोस्टन येथे शिक्षण घेत असताना अभिजीत दिपके ६ जून रोजी भारतात नीटच्या आंदोलनासाठी दाखल झाले. पब्लिक रिलेशनचे शिक्षण घेत असताना त्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या ‘भारतातील बेरोजगार तरुण झुरळासारखे’ या टिप्पणीवरून तयार केलेले पेज चर्चेत आले. मस्करीत सुरू केलेल्या या पेजला अवघ्या चार दिवसांत दोन कोटीहून अधिक लोकांनी फॉलो केले. ज्यामुळे याची दखल मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि राजकीय पक्षांना घ्यावी लागली.
सोशल मीडियावर सुरू झालेली ही ऑनलाइन चळवळ नीट पेपरफुटीच्या ताज्या प्रकरणामुळे ऑफलाइन मैदानात उतरली. नीट पेपरफुटी प्रकरणात अभिजीत दिपकेंनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आंदोलनाची हाक दिली.
आंदोलनाची सुरुवात कशी झाली?
अभिजीत दिपके भारतात आल्यानंतर विविध शहरात मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर जंतर-मंतर येथे बेमुदत आंदोलन सुरू झाले. सुरुवातीला या आंदोलनाला विद्यार्थी, ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केली, त्यांचे पालक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठिंबा होता. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचीही नंतर साथ लाभली. ज्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या १७ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. ज्यामुळे आंदोलन पेटले आणि त्याला विविध स्तरातून पाठिंबा मिळू लागला. २० जुलैच्या संसद मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाची धग देशभर पसरली. त्यानंतर २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजीत दिपकेंच्या टीमचा विजय झाल्याचे म्हटले गेले.
अभिजीत दिपकेंचे बालपण आणि शिक्षण
१९९६ साली जन्मलेले अभिजीत दिपके जेन झी पिढीच्या एक वर्ष आधी जन्मलेले आहेत. पण ते या पिढीचे प्रश्न मांडण्यात यशस्वी ठरले. कॉक्रोच जनता पार्टीच्या संकेतस्थळानुसार, अभिजीत दिपकेंचे बालपण छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले. त्यांचे वडील राज्य वीज मंडळात अभियंता म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या आई घरीच शिकवणी वर्ग घेतात.
दिपके यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून घेतले असल्याचे या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. तर ११ आणि १२ त्यांनी सीबीएसईच्या इंग्रजी माध्यमातून केले असल्याचे नमूद केले आहे. इयत्ता बारावीला त्यांनी ६५ टक्के गुण मिळवल्याचेही याठिकाणी लिहिले आहे.
२०१८ साली दिपके यांनी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, औरंगाबाद येथून कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी वादविवाद स्पर्धा आणि विद्यार्थी परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. महाविद्यालयात असताना त्यांनी लिहिलेला टायर २ इंजिनिअर हा ब्लॉगही चांगलाच लोकप्रिय ठरला होता. आयआयटी आणि एनआयटीच्या बाहेरील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी कोणत्या अडचणींचा सामना करतात, याची त्यांनी मीमांसा केली होती.
पदवी मिळवल्यानंतर दिपकेंनी पुण्यात चार वर्ष बॅकएंड डेव्हलपर म्हणून काम केले. २०२३ साली त्यांना बोस्टनच्या पार्डी स्कूल ऑफ ग्लोबल स्टडीजमध्ये पदव्यूत्तर पदवीसाठी प्रवेश मिळाला.
