Janta Party Team education qualifications : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अभिजीत दिपके या अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्याने कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. या संघटनेकडून नीट पेपरफुटीप्रकरणी मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त होऊन यशही प्राप्त झालं. दरम्यान, आता कॉक्रोच जनता पार्टीची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. यामध्ये पत्रकार, अभियंता, वकील, दोन चार्टर्ड अकाऊंटंट, एक उद्योजक आणि एक हॉटेल मॅनेजमेंट पदवीधर यांचा समावेश आहे. या उच्चशिक्षित तरुणांकडे पक्षाची धुरा देण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त आहे.

महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांनी दोन दिवसीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत या गटाने पुढील सहा महिन्यांसाठी आपली संघटनात्मक रचना जाहीर केली आणि राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार केला. पण या संघटनेमार्फत दबाव गट निर्माण होण्याची शक्यता आहे. अभिजीत दिपके यांनीही याबाबत अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, या संघटनेतील कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.

१. अभिजीत दिपके (३०): संभाजीनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी. दिपके यांनी पुण्यातून पत्रकारिता आणि जनसंवाद (Journalism and Mass Communication) मध्ये पदवी आणि बोस्टन युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून जनसंपर्कमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

भूमिका: संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक

२. आशुतोष रांका (३०): जयपूर, राजस्थान येथील रहिवासी. रांका यांच्याकडे आयआयटी कानपूरमधून बी.टेक. पदवी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनमधील पदव्युत्तर पदवी आहे.

भूमिका: सह-संयोजक

३. सौरव दास (२७): दिल्लीचे रहिवासी. दास यांच्याकडे पत्रकारिता आणि जनसंवादमधील पदवी आहे.

भूमिका: सह-संयोजक

४. अजिंक्य शिंदे (३५): लातूर, महाराष्ट्र येथील रहिवासी. शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड, महाराष्ट्र येथून बी.टेक. पदवी आहे.

भूमिका: राष्ट्रीय संघटन प्रभारी

५. दीपक बालियान (२६): अलवर, राजस्थान येथील रहिवासी. बालियान यांनी भरतपूर येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून शेतकरी आंदोलनांशी सक्रियपणे जोडलेले आहेत.

भूमिका: संघटन सह-प्रभारी आणि उत्तर विभागाचे प्रमुख

६. आफरीन नवाज (३४): बेंगळुरू, कर्नाटक येथील रहिवासी. नवाज यांच्याकडे एमबीए पदवी असून सध्या त्या उद्योजक आहेत.

भूमिका: राष्ट्रीय सचिव

७. विजय रेड्डी मल्लांगी (३०): हैदराबाद, तेलंगणा येथील रहिवासी. मल्लांगी यांनी उस्मानिया विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि कोलंबिया विद्यापीठातून अप्लाइड सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

भूमिका: मीडिया प्रमुख आणि दक्षिण विभागाचे प्रमुख

८. रत्न सिंग (३१): लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी. सिंग यांनी गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली येथून एलएल.बी. (LL.B.) पदवी घेतली आहे.

भूमिका: कायदेशीर व्यवहार प्रमुख

९. वैष्णवी गौर (२९): डेहराडून, उत्तराखंड येथील रहिवासी. गौर यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून बीए एलएल.बी. (ऑनर्स)पदवी घेतली आहे.

भूमिका: संशोधन आणि धोरण प्रमुख

१०. रोहन देशपांडे (३१): मुंबईचे रहिवासी. देशपांडे यांनी आयएचएम मुंबई (IHM Mumbai) मधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.

भूमिका: तंत्रज्ञान प्रमुख

११. योगेश इंगळे (३३): पुणे, महाराष्ट्र येथील रहिवासी. इंगळे हे चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत.

भूमिका: वित्त प्रमुख आणि पश्चिम विभागाचे प्रमुख

१२. अंकित भारद्वाज (३५): गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील रहिवासी. भारद्वाज हे चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत.

भूमिका: पूर्व आणि उत्तर-पूर्व विभागाचे प्रभारी आणि प्रमुख