पुनर्लागवड अनुदान थकवले, २५ कोटींच्या निधीची प्रतीक्षा  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले अशी गत रायगड जिल्ह्यातील नारळ आणि सुपारी बागायतदारांची झाली आहे. निसर्ग वादळानंतर बागायतदारांना वाटप करण्यात आलेल्या रोपांची बिले अलिबाग तालुक्यातील अनेक बागायतदारांना प्राप्त झाली आहेत. या बिलांच्या वसुलीसाठी आता खाजगी नर्सरीचालकांनी बागायतदारांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बागायतदार त्रस्त झाले आहेत.

३ जून २०२० ला निसर्ग वादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला होता. यात सुमारे ११ हजार हेक्टरवरील फळबागांचे मोठं नुकसान झाले होते. निसर्ग वादळानंतर उद्ध्वस्त झालेल्या बागांच्या पुनर्लागवडीसाठी शासनाने रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शासकीय रोपवाटिकेत रोपे उपलब्ध नसल्याने खाजगी नर्सरी व्यवसायिकांकडून तसेच दापोली कृषी विद्यापीठाकडून रोपे घेऊन ती बागायदरांना उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र या रोपांचा मोबदला अद्यापही खाजगी नर्सरीचालक आणि दापोली कृषी विद्यापीठाला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनीही कृषी विभागाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी तगादा लावला आहे. 

नर्सरी व्यवसायिकांनी आता ही रक्कम बागायतदारांकडून वसूल करण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांनंतर अनेक बागायतदारांना यासंदर्भातील देयके प्राप्त होत आहेत. त्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. ही देयके भरा, शासनाकडून बागायतदार खात्यात रक्कम जमा केली जाईल अशी ग्वाही कृषी विभागाने दिली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी देयकांची रक्कम दिली आहे. त्यांना कुठलीही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली आहे.  फळबाग पुनर्लागवड योजनेला रोजगार हमी योजनेची जोड

देण्यात आली आहे. त्यामुळे रोपांची रक्कम आधी शेतकऱ्यांनी नर्सरीचालकांना द्यावी लागणार आहे. ही रक्कम नंतर बागायतदारांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात येत आहे.

पैसे अद्याप सरकारकडून आले नाही

या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता खाजगी रोपवाटिकांचे पैसे अद्याप सरकारकडून आले नसल्याचे सांगण्यात आले. पुनरुज्जीवन आणि पुनर्लागवडीचे मिळून २५ कोटी रुपये सरकारकडून येणे बाकी आहे. कृषी विभगाकडून यासंदर्भातील प्रस्ताव रोजगार हमी विभागाला देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर असून लवकरच त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखोले यांनी स्पष्ट केले आहे.

ही रक्कम प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही कृषी विभागाच्या सुचनेनु सार नर्सरीमधून रोपे घेतली, मात्र त्याचे पैसे जमा झालेले नसल्याने कृषी विभागाने नर्सरीला पैसे अदा करण्याच्या केलेल्या सुचनेनुसार पैसे दिले आहेत. मात्र अजूनही पैसे आमच्या खात्यात जमा झालेले नाहीत. तसेच आमचे नारळ, सुपारी, आंबा, असे अनेक फळझाडांचे नुकसान झालेले असताना रोपे मात्र फक्त सुपारीचीच देण्यात आली आहेत.

 – सागर नाईक, बागायतदार

बागायतदारांना कृषी विभागाच्या सुचनेनुसार रोपे दिली. मात्र शासनाकडून अजूनही निधी आला नसल्याने या रोपांचे सुमारे १३ लाख रुपये आम्हाला येणे आहेत. १० टक्के बागायतदारांनी पैसे अदा केले. त्यामुळे उर्वरित पैशांसाठी सदर निधीच्या आम्हीदेखील प्रतीक्षेत आहोत.

 – हेमंत पाटील, नर्सरीचालक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut and arecanut growers in alibaug not get government help zws
First published on: 24-06-2022 at 00:30 IST