रावसाहेब दानवे यांचा अंदाज

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता येत्या ७ अथवा ८ मार्च रोजी लागेल, असा अंदाज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपच्या संघटन संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृश्यवाणीच्या माध्यमातून भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना श्री. दानवे म्हणाले की, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली-कोल्हापूर दौरा रद्द झाला. यापूर्वीही काही अपरिहार्य कारणामुळे शहांचा सांगली दौरा रद्द झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा ७ किंवा ८ मार्च रोजी होईल असा कयास असून त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे. कार्यकर्त्यांनी आता कामाला लागणे गरजेचे आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने केलेली विकासाची कामे जनतेसमोर मांडण्यासाठी बूथ कार्यकर्ता चांगली भूमिका निभावू शकतो.

राज्यात गेल्या पाच वर्षांत भाजपने चांगले स्थान निर्माण केले असून आज राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. राज्यात १० हजार सरपंच भाजपचे असून २७ पैकी १८ महापालिकेतील सत्ता भाजपकडे आहे. तर ९० नगरपालिका आणि १० जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. तसेच मुख्यमंत्री पद आणि १२३ आमदार, २३ लोकसभा सदस्य ही भाजपची गेल्या पाच वर्षांतील प्रगती आहे. यामुळे सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपला पराभूत करणे अशक्य आहे.

भाजपल या वेळी जर पराभूत केले नाही तर पुढील ५० वर्षे सत्ता मिळणार नाही या धास्तीने सर्व विरोधक एकत्र येत असल्याचा आरोप करून श्री. दानवे म्हणाले की, भाजपच्या प्रचारासाठी राज्यात सर्वच ठिकाणी ३ मार्च रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. देशपातळीवर ही रॅली २ मार्च रोजी काढण्यात येणार असली, तरी राज्यात मात्र विधिमंडळ अधिवेशनामुळे ३ मार्च हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.