गेले दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या नंदनवनातील महाबळेश्वरमध्ये पारा वेगाने खाली उतरला असून आज भल्या पहाटे तर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक ते िलगमळा परिसरातील सुमारे २ किलोमीटरच्या पट्टय़ात तेथील किमान तापमान १ ते २ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली उतरला होता यामुळे त्या भागातील दविबदू गोठून हिमकण मोठय़ा प्रमाणावर जमा झाल्याचे दिसून आले. तो सर्व परिसर हिमकणांनी पांढरा झाला होता. दरम्यान शासनाचे सहायक संचालक (माहिती) प्रशांत सातपुते यांच्यासह अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत हिमकणांचा आनंद मुक्तपणे लुटला
           राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढत असून महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरही त्यास अपवाद नाही. गेले दोन दिवस येथे प्रचंड थंडी होती. आज भल्या पहाटे तर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक ते िलगमळा परिसरातील सुमारे २ किलोमीटरचा पट्टा थंडीने हुडहुडला होता. या परिसरात कडाक्याची थंडी होती. तापमान १ ते २ अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरले होते. यामुळे या परिसरातील स्टॉबेरी फळांची रोपे-पाने, बटाटय़ाची रोपे-पाने, तसेच स्मृतिवन पठार दविबदू मोठय़ा प्रमाणावर गोठल्यामुळे ते पांढरे शुभ्र झाले होते. स्टॉबेरी व बटाटा रोपांच्या पानांवर तर हिमकणांची नक्षी काढल्याचे भासत होते, तर संपूर्ण स्मृतिवन हिमकणांची दुलई पांघरून बसल्याचे मनोहारी दृश्य दिसत होते. या दोन किलोमीटर परिसरातील बहुतेक वाहनांच्या टपांवर हिमाकणांची रजई पसरल्याचे भासत होते, तर वेण्णालेकच्या जेटीवरही हिमाकणांचे थर पाहावयास मिळाले. या हंगामातील असे हिमकण या पूर्वी २२ डिसेंबरला दिसले होते मात्र आज त्यापेक्षा जास्त प्रमाणात ते दिसले.