scorecardresearch

महाबळेश्वर, पाचगणीसह साताऱ्यात थंडीचा कडाका

महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

वाई : महाबळेश्वर पाचगणीसह साताऱ्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पहाटे कडाक्याची थंडी पडत असून महाबळेश्वर पाचगणीबरोबरच अनेक ठिकाणचा पारा घसरला आहे. थंडी वाढल्याने गवतावर पडलेले दविबदू काही प्रमाणात गोठले. वाईला पाचगणी महाबळेश्वरला थंडीचा मोठा कडाका आहे. पहाटेपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. जिल्ह्यातील डोंगर सातारा, वाई शहर, कृष्णा नदीपात्र आणि गणपती घाट धुक्यात हरवला आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाबळेश्वर येथील वेण्णातलावावरील दविबदू गोठत असतात. यंदा मात्र जानेवारीमध्ये गुलाबी थंडी पडली असल्याने दविबदू गोठण्यास सुरुवात झाली आहे. करोनामुळे पर्यटनस्थळ बंद केल्याने पर्यटकांना मात्र याचा आनंद घेता येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची नजाकत दाखवून देत असून गेल्या काही दिवसांपासून येथील पारा घसरत चालला आहे. सोमवारी शहरात ६.५ अंश तापमानाची नोंद झाली असून शहरी भागापेक्षा वेण्णातलाव व लिंगमळा परिसरात थंडीचे प्रमाण अधिक आहे. 

महाबळेश्वर सोडून खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत. महाबळेश्वर शहरासह वेण्णातलाव परिसर, लिंगमळा परिसरात या थंडीचे प्रमाण अधिक जाणवते. तापमान घसरल्याने वेण्णातलाव परिसर पहाटे धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. महाबळेश्वर शहरात सोमवारी सकाळी ६.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या मोसमात दोन वेळा वेण्णातलावसह लिंगमळा परिसरात हिमकणांची नजाकत अनुभवायास मिळाली होती. थंडीचा कडाका असाच राहिला तर पुन्हा एकदा पर्यटकांसह स्थानिकांना हिमकणांची नजाकत (पर्वणी) अनुभवायास मिळेल. वाढत्या थंडी आणि धुक्यांचा सामना मॉर्निग वॉकला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना, दूध विक्रेत्यांना, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. या धुक्यामुळे ज्वारीसह, भाजीपाला, फळ फळबागांना पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटणसह माण, खटावलाही धुक्याची झालर पसरलेली होती. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शोल्स, मफलर, कानटोपी अशी गरम वस्त्रे परिधान करून गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत असून मुख्य बाजारपेठेत देखील उबदार शाल, स्वेटर, मफलर, ब्लँकेट्स आदींच्या खरेदी करताना पर्यटक दिसत आहे. दररोज रात्री सर्वत्र शेकोटी पेटवून वातावरणातील गारवा कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cold snap satara mahabaleshwar pachgani ysh

ताज्या बातम्या