सातारा : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने श्री शाहू कलामंच, सातारा या ठिकाणी शाहिरी महोत्सवाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले.तीन दिवस आयोजित केलेल्या या शाहिरी महोत्सवाला रसिकांचा चांगला प्रतिसाद असून सातारकरांनी या शाहिरी महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
याप्रसंगी सातारा पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट, राज्य सांस्कृतिक पुरस्कार मान्यवर शाहीर राजू राऊत, तसेच शाहीर अवधूत विभुते, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य श्री पंकज चव्हाण, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नीलेश धुमाळ उपस्थित होते.
या शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री, ॲड. आशिष शेलार यांची आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा सातारा जिल्ह्यामध्ये शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहिरी व संगीतावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० वाजता शाहू कलामंदिर, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पाची सुरुवात युवा शाहीर प्रदीप सुतार, पुणे यांच्या पोवाड्याने झाली. त्यानंतर शाहिरा तृप्ती सावंत, कोल्हापूर व शाहीर आलम पाटवेगार, बागणीकर यांचे सादरीकरण झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाहिरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये शाहीर अंबादास तावरे, शाहीर देवानंद माळी, शाहीर राजू राऊत, शाहीर दादा पासलकर, शाहीर अवधूत विभुते, शाहिरा सीमा पाटील, शाहिरा अनिता खरात यांसारख्या ज्येष्ठ शाहिरांचा सहभाग होता. या परिसंवादमध्ये शाहिरीसमोरील आव्हाने, शाहिरीतील बदल, परंपरा, इतिहास, आजची शाहिरी, संवर्धन अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.