घोडेसवारीसाठी ठरवलेल्या घोडय़ावर न बसता शेजारील घोडय़ावर बसल्याचा राग धरून पुणे येथून सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला घोडेवाल्यांनी चाबकाने मारल्याने तो जखमी झाला. या प्रकाराने प्रसिद्ध वेण्णा तलावावर शनिवारी सायंकाळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाबळेश्वर येथे फिरावयास आलेल्या पर्यटक व काही जागरूक पत्रकारांनी त्या वेळी केलेल्या चित्रणामुळे सारा प्रकार उघडकीस आला.महाबळेश्वर पोलिसांनी याबाबत घोडेवाल्यांविरोधात कठोर कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेत, चार जणांवर सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केला म्हणून समज देण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. पर्यटकांना या ना त्या कारणाने मारण्याचे येथील प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
   याबाबतची समजलेली माहिती अशी, घोलप कॉलेज सांगवी (पुणे) येथील सुमारे ७० विद्यार्थी शनिवारी दोन मिनी बसेस करून महाबळेश्वर येथे फिरावयास आले होते. दिवसभर येथील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी पुण्यास परतण्यापूर्वी विद्यार्थी येथील प्रसिद्ध वेण्णा तलावावर थांबले. काल शनिवारी वरील महाविद्यालयातील काही मुले-मुली फिरण्याचा आनंद घेत होते. काही मुले घोडेवाल्यांकडे रपेटीसाठी मागे लागले म्हणून घोडय़ावर बसण्याच्या गडबडीत असतानाच यातील एक विद्यार्थी एका घोडय़ावर बसून रपेट मारून आला. तू मला सांगितले होते अन् दुसऱ्या घोडय़ावर का बसलास म्हणून त्या मुलास घोडेवाले मारायला लागले. बघता बघता सर्व घोडेवाले एकत्र होऊन विद्यार्थ्यांना मारू लागले. एका घोडेवाल्याने तर चाबकाने मुलांना मारायला सुरुवात केली. त्यात प्रशांत कदम हा युवक जखमी झाला. मुलांची काही चूक नसताना त्यांना घोडेवाले नाहक मारत आहेत हे पाहून तेथे जमलेले काही पर्यटक मध्ये पडले. मात्र घोडेवाले ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. चाबकाचे फटके बसल्याने कदमच्या अंगावर वळ उठले होते. याच वेळी तेथे सातारा जिल्ह्यातील काही पत्रकार मंडळी फिरावयास आली होती. त्यातील अनेकांनी याचे चित्रीकरण आपल्या मोबाइलमध्ये केले होते. त्यावरून घोडेवाल्यांची मनमानी अगदी उघडपणे दिसत होती. त्यांनी आवाज उठवल्यावर पोलीस आले. काही घोडेवाल्यांना व मुलांना पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या बरोबर काही प्राध्यापकही पोलीस ठाण्यात गेले. तोपर्यंत ठाण्यात स्थानिकांची गर्दी झाली आणि जे नेहमी होते तेच झाले. पोलिसांनी अश्फाक दाऊद डांगे, नदीम ताजुद्दिन नालबंद, अविनाश शिवशय्या व सनी कांबळे या चार घोडेवाल्यांना सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केला म्हणून प्रत्येकी शंभर रुपयांच्या पावत्या फाडून समज दिली व सोडून दिले. दरम्यान हा सारा प्रकार पाहून आधीच घाबरलेले युवक व त्यांचे प्राध्यापक आपल्याला न्याय कितपत मिळेल या भीतीने व उशीर झाल्याने हताश होऊन तेथून तक्रार न देताच निघून गेले.