हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात यंदा विविधरंगी भातपीक लागवडीचे प्रयोग घेण्यात आले आहेत. गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ या प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा लाल भाताची यशस्वी लागवड केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सेंद्रिय पद्धतीने, कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता त्यांनी या भाताचे उत्पादन घेतले आहे.  यासाठी आत्मा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळा, लाल आणि जांभळय़ा रंगाच्या भात प्रजातींचे ८४ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्घ करून देण्यात आले होते. यातून २१० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खुल्या बाजारात विविधरंगी भाताला चांगली किंमत मिळते ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावार ही लागवड करण्यात आली आहे.  

   जिल्ह्यात यंदा १ लाख २४ हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी १ लाख हेक्टरवर यंदा भात लागवड करण्यात आली आहे. भाताची उत्पादकता आणि उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अधुनिक भात लागवड पद्धती, आणि संकरित बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र अजूनही पारंपरिक बियाण्यांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्याची उत्पादकता वाढण्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे.    ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संकरित बियाणे लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी विभागाने आत्मा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात लाल, काळा आणि जांभळय़ा रंगाचे भात उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ८४ क्विंटल संकरित भात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. मध्य प्रदेश आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून यासाठी बियाणे मागविण्यात आले होते. या बियाण्यांचा वापर करून यंदा २१० हेक्टरवर लाल, काळय़ा आणि जांभळय़ा रंगाच्या भातपिकाची लागवड करण्यात आली आहे.

खुल्या बाजारात या प्रकारच्या भातांना मोठी मागणी आहे. त्यास चांगला दरही मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदा कृषी विभागाने विविधरंगी भात लागवडीचे प्रयोग घेतले आहे. शेतकऱ्यांचाही यास सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. गुळसुंदे येथील प्रयोगशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी लाल भात लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांच्या या प्रयोगाला यंदा चांगले यशही आले आहे. लाल, काळय़ा आणि जांभळय़ा रंगाच्या या भातात प्रथिने आणि कबरेदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

हा भात मधुमेह आणि इतर आजारांतील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे अलीकडच्या काळात या प्रकारच्या भाताला मागणी वाढली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात लाल, काळय़ा आणि जांभळय़ा रंग्याच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. लाल तांदुळात ‘अ‍ॅन्थोसॅयनीन’ हे नैसर्गिक पिग्मेट अढळते. बारीक पॉलिश तांदळाची ‘ग्लॅयसेमिक इन्डेक्स’ जास्त असते तर लाल व आर एन आर तांदळाची ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी असते, त्यामुळे सदर तांदळाचा भात खाल्ल्यानंतर रक्तात साखर एकदम वाढल नाही. त्यामुळे डायबेटिस पेशंट सदर तांदळाच्या भाताचा आपल्या आहारात वापर करू शकतात. वरील तांदळात आयर्न, व्हिटॅमिन्स्, अ‍ॅन्टीऑक्सिड्न्ट जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळेच एक पूरक आहार म्हणून या तांदळाचा वापर होऊ शकतो. ब्लॅक आणि पर्पल राइस लागवड सुरुवातीला जपानमध्ये करण्यात आली होती. नंतर फिलिपिन्स, चीन, थायलँण्ड, बांग्लादेश आणि भारतात याची लागवड केली जाऊ लागली. भारतात प्रामुख्याने मणिपूर आणि आसाममध्ये याची लागवड केली जाते. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या भाताला चांगला दर मिळतो.

शेतकरीवर्ग पारंपरिक भात पिकवण्यात व  विकण्यात धन्यता मानतात, ज्याला जास्तीत जास्त २० रु. प्रति किलो दर मिळू शकतो, परंतु लाल भाताची लागवड करून त्यानंतर स्वत: प्रोसेसिंग करून तांदूळ विकल्यास शंभर ते सव्वाशे रुपये दर मिळू शकतो आणि म्हणूनच उत्पादन खर्च, बाजारभाव व नफा याची सांगड घालायची असेल तर नावीन्यपूर्ण उत्पादन घेण्याचा विचार शेतकऱ्यांकडून होण्याची गरज आहे.

–  मीनेश गाडगीळ, शेतकरी गुळसुंदे 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colorful rice cultivation experiments in raigad farmers grew red rice ysh
First published on: 25-09-2022 at 00:47 IST