केंद्राच्या त्रिसदस्यीय समितीने ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ला (एफटीआयआय) शुक्रवारी दिलेल्या भेटीमुळे संस्थेतील तणावाचे वातावरण एकदम पालटले आहे. या समितीचा अहवाल सोमवारी मंत्रालयाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती समितीचे सदस्य एस. एम. खान यांनी दिली. समितीने आपले म्हणणे ऐकून घेण्यात रस दाखवल्यामुळे संपाची कोंडी लवकरच फुटेल, अशी आशा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
खान हे ‘ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया’चे महासंचालक असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्याबरोबर चित्रपट विभागाच्या संचालक अंशू सिन्हा आणि अंतर्गत सचिव एस. नागनाथन यांचाही समितीत समावेश होता. खान म्हणाले, ‘एफटीआयआयप्रश्नी तर्कशुद्ध तोडगा निघू शकेल याविषयी आम्ही आशावादी आहोत. आम्ही विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सर्वाशी बोललो. विद्यार्थ्यांचे आमच्याशी वर्तन चांगले होते. संस्थेच्या प्रांगणात संचालकांसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचे माझे मत असून त्याविषयीही संचालकांशी चर्चा झाली.’ संपूर्ण चर्चेचा तपशील जाहीर करण्यास तसेच विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल बोलण्यास मात्र खान यांनी नकार दिला. समितीबरोबरच्या चर्चेत ८ विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी होते.
विद्यार्थ्यांची मूळ मागणी आणि संपकाळात मध्येच उपटलेल्या मूल्यमापनासारख्या इतर गोष्टींची एकत्र गल्लत करणे बरोबर नाही, असे मत माजी विद्यार्थिनी सुरभि शर्मा यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना झालेल्या अटकेनंतर संस्थेच्या प्रांगणात बरे वातावरण नाही. याबाबत आम्ही समितीस सांगितले. समितीने आमचे म्हणणे ऐकून घेतले. एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली, परंतु २००८ सालच्या विद्यार्थ्यांच्या मुद्दय़ावर विशेष चर्चा झाली नाही. आता सरकार या संस्थेस अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल असे वाटते.
नचिमुथ्थू हरिशंकर , विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष