सत्ताकेंद्रित प्रवृत्ती रोखण्यासाठी सामान्य माणूस काय करतो हे दिसेल-शरद पवार

गुजरातचा विकासदर काँग्रेसच्या सत्तेच्या काळात १७ टक्क्यांवर होता. नरेंद्र मोदींच्या काळात हा विकासदर ८ टक्क्यांवर घसरला असल्याने गुजरातच्या विकासाचे मॉडेल देशासाठी निश्चितच घातक असल्याची टीका करताना, विरोधकांनी कांद्याच्या अन् वेळप्रसंगी कवडय़ाच्या माळा जरी घातल्या तरी, शेतमालाला उच्चांकी दर मिळवून देण्याची आपली भूमिका कायम राहणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली.

गुजरातचा विकासदर काँग्रेसच्या सत्तेच्या काळात १७ टक्क्यांवर होता. नरेंद्र मोदींच्या काळात हा विकासदर ८ टक्क्यांवर घसरला असल्याने गुजरातच्या विकासाचे मॉडेल देशासाठी निश्चितच घातक असल्याची टीका करताना, विरोधकांनी कांद्याच्या अन् वेळप्रसंगी कवडय़ाच्या माळा जरी घातल्या तरी, शेतमालाला उच्चांकी दर मिळवून देण्याची आपली भूमिका कायम राहणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली. विकासात महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात मागेच असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या मुद्दय़ावर आमने-सामने येण्याचे दिलेले आव्हान मोदी का स्वीकारत नाहीत असा सवाल त्यांनी केला.
सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री शशिकांत शिंदे, सभेचे निमंत्रक आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सारंग पाटील यांची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, की मताचा पत्ता नाही तोवरच पंतप्रधानपदासाठी मोदींची उमेदवारी जाहीर करणे म्हणजे सत्तेचे केंद्रीकरणाचा प्रयत्न आहे. मोदी दोन्ही गुडघ्यांना बाशिंग बांधून तयार आहेत. टीव्ही लावला की, पांढरी दाढी आणि मोदीच मोदी आणि भाजपचे नेतेतर मोदी म्हणूनच झोपेत चावळत आहेत. त्यांची काँग्रेसमुक्तीची भूमिका म्हणजे ज्या काँग्रेसने संघर्ष करून, इंग्रजांना पिटाळले, अशा काँग्रेसला मुक्त करण्याची भूमिका कितपत योग्य आहे, स्वातंत्र्य लढय़ात संघ आणि भाजपवाले होते का? मोदींना देशाचा इतिहास माहिती आहे का? चलेजावचा नारा कुठे देण्यात आला हेही मोदींना माहिती आहे का? असे प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्याचा इतिहास अहमदाबादमध्ये घडल्याचे मोदी सांगत नाहीत, हे नशीब असल्याची टीका पवारांनी केली. सत्ता ही एकाच्या हाती राहिल्यास ती भ्रष्ट होते. ती अनेकांच्या हाती राहिली पाहिजे. ही यशवंतराव चव्हाणांची भूमिका होती. तरी, मोदींसारखी सत्ताकेंद्रित प्रवृत्ती रोखण्यासाठी सामान्य माणूस काय करतो हे भाजपला दिसून येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
भिकेकंगाल आणि कुपोषण हे कलंक कायमचे पुसण्यासाठी केंद्राने अन्नसुरक्षा कायदा आणला. शेतकऱ्याला सक्षम बनविण्यासाठी ४ टक्क्याने कर्जाची सोय केली. व्यवस्थित कर्ज फेड करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजदर दिला. तरुणांना संधी देऊन राजकारभारासाठी नवी फळी उभारण्याची यशवंतराव चव्हाणांची भूमिका होती. तीच भूमिका घेऊन आम्ही पुण्यातून विश्वजित कदम, मावळमधून राहुल नार्वेकर, शिरूरमधून देवदत्त निकम, बारामतीतून माझी कन्या सुप्रिया तसेच साताऱ्यातून उदयनराजे अशी तरुणांची फळी उभी केली आहे. उदयनराजेंची दुसरी टर्म मताधिक्याने सुरू होईल असा विश्वास त्यांनी दिला. केंद्रातील भाजपच्या काळात शेतमालाला काय दर होता आणि आज शेतमालाचा भाव काय आहे हे पाहता आम्ही शेतमालाला मोठी किंमत मिळवून दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. शेतमालाला कधी नव्हे ते दर मिळताच विरोधक लगेच दंगा करतात. मिनरल वॉटर १५ ते २० रुपयांना आणि सिनेमा व नाटकाचे तिकीट २०० रुपयांना घेण्याची मानसिकता आहे. मात्र, कांद्याला भाव नको म्हणून, असलेल्या भूमिकेवर त्यांनी खंत व्यक्त केली. शशिकांत शिंदे म्हणाले, की शरद पवारांवरील प्रेम या निवडणुकीत दिसून येणार असून, उदयनराजेंना उच्चांकी मताने विजयी करा.
उदयनराजे म्हणाले, की अनुभव, विचार व कार्य पाहता शरद पवारांना पंतप्रधान म्हणून पहायचे आहे. मोदींच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याने ते पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान स्वीकारू शकत नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Common man action important in election sharad pawar

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या