राष्ट्रकुल विजेत्या आप्पालाल शेख यांची विपन्नावस्थेत अखेर

महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊ न सन्मानित केले होते.

|| एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : न्यूझीलंडमध्ये राष्ट्रकु ल क्रीडा स्पर्धेत अनेक भल्याभल्या मल्लांना लोळवून सुवर्णपदक मिळविलेले ‘महाराष्ट्र केसरी’ आप्पालाल शेख (वय ५४) यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकाराने गुरुवारी दुपारी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

पैलवान लाल मातीत कु स्त्या खेळून लौकिक मिळवेपर्यंत त्यास संस्था, संघटना, शासन, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळते. परंतु हाच पैलवान कु स्तीच्या आखाड्यातून बाहेर गेला की एकाकी पडतो. आप्पालाल शेख यांच्या बाबतीतही दुर्दैवाने हेच घडले. शारीरिक व्याधी आणि आर्थिक विवंचना यामुळे विपन्नावस्थेत त्यांचा शेवट झाला.

सोलापूरजवळील बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आप्पालाल शेख यांनी १९९३मध्ये पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना अस्मान दाखवून ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला होता. एकाच घरातून तिघे मल्ल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळविणारे बोरामणीचे एकमेव शेख कुटुंबीय आहे. यापूर्वी त्यांचे थोरले बंधू इस्माईल शेख हे १९८० साली खोपोली येथे कु स्ती अधिवेशनात ‘महाराष्ट्र केसरी’ झाले, तर त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी जालना येथे २००१-०२ साली ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावली होती.

अल्पभूधारक असलेले शेकुंबर शेख यांना कुस्तीचा छंद असल्यामुळे त्यांनी आपली मुले इस्माईल व आप्पालाल यांना आर्थिक भार सोसत नसतानाही कु स्तीचे धडे घेण्यासाठी १९८५-८६ साली कोल्हापूरला शाहूपुरी तालमीत पाठवले होते. वस्ताद मोहम्मद हनीफ यांच्या तालमीत दोन्ही मुले तरबेज झाली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि वस्ताद मुकुंद करजगार यांनीही त्यांना कु स्तीचे डावपेच शिकवले होते.

आप्पालाल यांनी न्यूझीलंडमधील राष्ट्रकु ल स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इराण, बल्गेरिया व अन्य राष्ट्रांच्या मल्लांना हरवले आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या मल्लाला अस्मान दाखवत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. ‘घिस्सा’ डाव टाकून कु स्ती जिंकणे ही आप्पालाल यांची विशेष हातोटी होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊ न सन्मानित केले होते.

कुस्तीची घरातील परंपरा पुढे नेण्यासाठी आप्पालाल यांनी आपली मुले अशपाक, अस्लम आणि गौसपाक यांना कोल्हापूरला पाठवले होते. तेथे मुलांचा सराव सुरू असतानाच इकडे गावात आप्पालाल यांचा मधुमेह बळावला आणि मूत्रपिंडाच्या विकाराने ते पछाडले. शासनाकडून मिळणारे मानधन तुटपुंजे आणि तेसुद्धा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतीवर अवलंबून राहिलेल्या शेख कुटुंबीयांची परवड सुरू झाली. अशा विपन्नावस्थेत काही दानशूर मंडळींनी मदतीचा हात दिला. आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी तिन्ही मुलांना कोल्हापूर सोडावे लागले. यातच तीन महिन्यांपूर्वी आप्पालाल यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे ते आणखी खचले. यातच आजार बळावला आणि आप्पालाल यांचा शेवट झाला. सायंकाळी बोरामणी गावात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Commonwealth games new zealand gold medalist maharashtra kesari appalal sheikh passes away akp

ताज्या बातम्या