scorecardresearch

अमरावतीत जातीय विद्वेषाचे निखारे ; पाच महिन्यांत दुसरी घटना

गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला मुस्लीम संघटनांनी अमरावतीत काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले,

मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : अचलपुरातील जातीय तणाव आता निवळला असला, तरी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडलेल्या अमरावती शहरातील हिंसाचाराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणच्या दंगलीतील समान दुवे आता शोधले जात आहेत. धार्मिक तेढ पद्धतशीरपणे वाढविण्याचा कुणाचा प्रयत्न आहे का, एकोपा कायम राखण्यात राजकीय नेते कमी पडत आहेत का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

अचलपूर हे ऐतिहासिक आणि संवेदनशील शहरदेखील आहे. धार्मिक संघर्षांचे अनेक कटूप्रसंग अचलपूर-परतवाडा या जुळय़ा शहराने यापुर्वी अनुभवले आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये शांततेचे वातावरण दिसले. गेल्या आठवडाअखेर अचलपुरातील दुल्हा दरवाजा या वास्तूवर धार्मिक झेंडा लावणे आणि काढणे यावरून दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या वादातून दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दंगल आटोक्यात आणली खरी, पण पोलीस यंत्रणेसाठी हा कसोटीचा काळ आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण जिल्ह्यात आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राजकीय संघर्षांत धार्मिक विद्वेषाचे जहाल तिखट मिसळले गेल्यास त्याचे काय दाहक परिणाम होतात, हे अमरावती शहराने आठवडाभर अनुभवले होते.

गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला मुस्लीम संघटनांनी अमरावतीत काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले, त्याचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी भाजपने बंदची हाक दिली, निदर्शने केली पण त्यानंतर अनियंत्रित जमावाने दंगल घडवून आणली होती. आता अचलपुरातही दोन गट आमने-सामने आले.

काही दिवसांपुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जन्मोत्सव या कार्यक्रमांच्या निमित्ताने अचलपूर- परतवाडय़ात मोठय़ा संख्येच्या मिरवणुका निघाल्या. रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील भाजपच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. आणि त्यातूनच अचलपूर नगर परिषदेची आगामी निवडणूक डोळय़ासमोर ठेवून भाजपने शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा रंगली. मिरवणुकीत प्रचंड घोषणाबाजी झाली. पण मिरवणुका शांततेत पार पडल्या. काही अनिष्ट घडू शकते, अशी शंका मात्र व्यक्त केली जात होती, कारण गेल्याच महिन्यात काश्मिर फाइल्स या चित्रपटावरून वाद उद्भवला होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने त्याला जातीय रंग चढू शकला नव्हता.

अचलपूर-परतवाडा या जुळय़ा शहरासोबत कांडली, देवमाळी, नारायणपूर ही गावे जोडली गेली आहेत. अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा या तीन पोलीस ठाण्यांवर जिल्ह्यातील या दुसऱ्या क्रमांकाच्या शहराचा भार आहे. त्यातच कांडली हे गाव गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे चर्चेत आले आहे. चोरी, अवैध व्यवसाय, प्राणघातक हल्ले असे येथील गुन्हेगारीचे स्वरूप आहे. गेल्या महिन्यातच कांडली येथील उपसरपंचावर प्राणघातक हल्ला झाला होता. पोलिसांचा वचक राहिलेला नाही, असा आक्षेप लोक घेत असतानाच अचलपुरात जातीय तणावाची घटना घडली.  राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांमध्ये समन्वय नसल्याने झेंडा काढण्याची एखादी साधी घटनादेखील जातीय दंगलीचे स्वरूप धारण करून शहरातील सामाजिक सलोख्याचे वातावरण क्षणात गढूळ करून जाते, हे अचलपूर- परतवाडावासीयांना दिसले आहे. या प्रकरणात भाजपचे अचलपूर शहराध्यक्ष अभय माथने यांच्यासह २७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशीतून अनेक गोष्टी आता उघड होतील, पण या घटनेला राजकीय कंगोरे आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. सुट्टय़ा असल्याने सलग चार दिवस बँका बंद, बाजार समिती बंद, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. चार दिवसांत संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले, शिक्षणासह सर्व व्यवस्था ठप्प पडल्या. सामान्य माणसांची ही होरपळ राजकीय नेत्यांना दिसत नाही, का असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. आता काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे.

जिल्ह्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात सर्वाचे सहकार्य आवश्यक आहे. अमरावतीची शांततेची, सलोख्याची जी ओळख आहे, ती टिकवून ठेवायची आहे. आजूबाजूला राहून काही लोक शांततामय वातावरण बिघडवू पाहात आहेत, त्याला वेळीच रोखावे लागेल. जनताच त्यांना धडा शिकवेल.

यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Communal tensions in amravati second incident in five months zws

ताज्या बातम्या