अहिल्यानगर : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) स्थापनेच्या शताब्दीनिमित्त शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील पक्ष कार्यालयासमोर उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. लाल ध्वज फडकावत ‘लाल सलाम’च्या घोषणा देण्यात आल्या. देशासाठी पक्षाने दिलेल्या त्याग, बलिदान आणि संघर्षाच्या इतिहासाची आठवण करून देत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

भाकपच्या पक्ष कार्यालयातून निघालेल्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी हातात लाल ध्वज घेत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हमाल पंचायतीच्या सभागृहात शताब्दी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्यात कारभारी उगले, आनंद शितोळे, ॲड. सुधीर टोकेकर, संतोष खोडदे, पांडूरंग शिंदे, श्रीधर आदिक, लक्ष्मण नवले, ज्ञानदेव सहाने, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, बापूराव राशीनकर, बबनराव लबडे, रमेश नागवडे, भारती न्यालपेल्ली, सगुना श्रीमल, संगिता कोंडा, लक्ष्मीबाई कोटा, कन्हैय्या बुंदेले, सुभाष शिंदे, बेबीनंदा लांडे, भारत आरगडे, मारुती दहिफळे, सतीश पवार, राजेंद्र आव्हाड, रामदास वागस्कर, नानासाहेब कदम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आनंद शितोळे यांनी स्वातंत्र्यानंतरचा काळ पक्षासाठी संधी व आव्हानांचा असल्याचे सांगितले. कामगार, शेतकरी, शेतमजूर कर्मचारी यांच्यासाठी दिलेल्या विविध लढ्यांमधून पक्षाने काही ठळक विजय मिळवले. शंभर वर्षांचा कालावधी हा‌ संघर्षाचा आणि क्रांतीकारक इतिहास आहे. डाव्या विचारांनी कला-साहित्य क्षेत्रातही खोल ठसा उमटवला.

प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनसारख्या चळवळींनी जनमानसाशी संवाद साधला, असे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. सुभाष लांडे म्हणाले, समाजातील तळागाळातील शेतकरी, कामगार, उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पक्षाने सातत्याने संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी भाकपने महत्त्वाचे योगदान दिले. यापुढे सामाजिक समानता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. पुढील शतकासाठी नवे प्रश्‍न आणि त्यावर ठोस प्रत्युत्तर घेऊन पक्ष सज्ज होत आहे.

प्राचार्य शिवाजी देवढे यांनी शंभर वर्षांचा आढावा मांडला. ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी पक्षात तरुण वर्गाला वाव द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट करुन आभार मानले. प्रास्ताविक संतोष खोडदे यांनी केले. अर्शद शेख, अशोक सब्बन, डॉ. आदित्य न्यालपेल्ली आदींनी शताब्दीनिमित्त शुभेच्छा दिल्या.