परभणी : स्पर्धा परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व गलथान नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून सरकारच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले.

आरोग्य विभागाच्या वर्ग ३ च्या परीक्षा होत्या. परंतु, बहुतांशी ठिकाणी वेळेवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नाहीत. एका पदाच्या प्रश्नपत्रिका दुसऱ्या पदासाठी असासुध्दा मोठा गोंधळ होता. त्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले, असा आरोप या संतप्त आंदोलनकर्त्यांनी केला. आरोग्य विभागातील परीक्षांतील गोंधळास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुध्द कठोर कारवाई करावी, पोलीस भरतीत पूर्ववत प्रथम मैदानी व नंतर लेखी परीक्षा घ्याव्यात, सरळ सेवेच्या सर्व परीक्षा लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द कराव्यात, सर्व स्पर्धा परीक्षांचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर करावे, निश्चित अभ्यासक्रम ठरवून द्यावा, यासह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे, अ‍ॅड. अमोल गिराम, आकाश लोहट, शिवाजी शेळके, दैवत लाटे यांच्यासह अन्य आंदोलनकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जीवघेणा खेळ

महाविकास आघाडी सरकारला  विद्यार्थ्यांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही, स्वत:ची पोळी भाजून घेण्याचे काम सरकार करत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हे सरकार क्रूरपणे खेळत आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनात उतरलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपण कायम राहू असे स्पष्ट करत आमदार  मेघना बोर्डीकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास र्पांठबा दर्शविला.