ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकास आमदार लंकेंकडून मारहाणीची तक्रार

ग्रामीण रुग्णालयात झालेल्या ‘रेमडेसिविर’ गैरव्यवहाराची वादाला किनार

ग्रामीण रुग्णालयात झालेल्या ‘रेमडेसिविर’ गैरव्यवहाराची वादाला किनार

पारनेर : येथील ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकास लसीकरणाचे टोकन विकत असल्याचा आरोप करीत आमदार नीलेश लंके यांनी मारहाण केली असल्याची तक्रार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्य्कीय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्याचबरोबर डॉ. मनीषा उंद्रे आणि डॉ. आडसूळ यांना शिवीगाळ  केल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या गैरव्यवहाराची किनार या वादाला असल्याचे समजते.

आमदार लंके यांनी ग्रामीण रुग्णालयात वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तपशील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांच्याकडे यापूर्वीच मागितला आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा उंद्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बुधवारी (दि. ४) रात्री साडेआठ वाजता तहसीलदार आणि डॉ. आडसूळ यांच्या आदेशानुसार लसीच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या टोकनचे वाटप करण्यात आले. रात्री साडेदहा वाजता आमदार नीलेश लंके आणि रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी टोकन वाटप करणारे कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांना घरून रुग्णालयात बोलावले. त्यांच्यावरती टोकन विकण्याचा आरोप करीत आमदार नीलेश लंके यांनी राहुल पाटील यांना मारहाण केली. या वेळी गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोर मारहाणीचा प्रकार घडल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी माने यांच्याशी वारंवार संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मारहाण झालीच नाही

आमदार नीलेश लंके  यांनी मला मारहाण केली नाही. मात्र मला मारहाण झाल्याचे खोटे संदेश समाजमाध्यमांवर पसरवणाऱ्या व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी लिपिक दिलीप पाटील यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बुधवारी रात्री लसीकरण टोकन वाटपात गोंधळ सुरू असल्याचे समजल्याने आमदार लंके ग्रामीण रुग्णालयात आले होते.त्यांनी गोंधळाबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.उंद्रे यांच्याकडे विचारणा केली. टोकन वाटपाची यादी तपासली.यादीत काही आक्षेपार्ह नावे आढळल्याने आमदार लंके यांनी डॉ.उंद्रे यांना जाब विचारला. त्यावर डॉ.उंद्रे यांनी आमदार लंके यांची माफी मागितली व पुन्हा असा प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली, असे पाटील यांनी पोलीस निरिक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लिपिक पाटील यांना मारहाण झालेली नाही. आमदार लंके यांचा या प्रकरणाशी संबंध नाही. लसीकरणाच्या टोकनची विक्री होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याने रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष या नात्याने मी चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. आमदार लंके त्या वेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांची चौकशी करण्यासाठी नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले होते. ‘रेमडेसिविर’ व टोकन वाटपातील गैरव्यवहार झाकण्यासाठी आरोप करण्यात येत आहेत.

 – डॉ. बाळासाहेब कावरे, अध्यक्ष, रुग्ण कल्याण समिती.

कथित प्रकार घडला त्या वेळी मी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित नव्हतो. मात्र गडबड  झाल्याचे कळल्यावर मी रुग्णालयात गेलो. लिपिक पाटील याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. टोकन वाटपात काही गडबड  झाली असेल तर पाटील यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करता येईल. त्यांची खातेनिहाय चौकशी होईल असे आपण आमदार लंके यांच्या निदर्शनास आणून दिले. या संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

 – घनश्याम बळप, पोलीस निरीक्षक पारनेर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Complaint against mla nilesh lanke for beating of rural hospital clerk zws

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?