मातापूर येथील गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (वय १७) हा महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या मामाने शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असली तरी पोलिसांनी मात्र तो घरातून निघून गेला, असा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. त्याच्या शोधासाठी मुंबईला पोलीस पथक जाणार आहे.
चास (ता. कोपरगाव) येथील गणेश हा मातापूर येथे त्याचा मामा सुनील सीताराम दौंड यांच्याकडे राहात होता. तो बोरावके महाविद्यालयात बारावीत शिकत होता. परीक्षेचा शेवटचा एक पेपर न देताच तो दि. १२ ला बेपत्ता झाला. पेपर अवघड गेल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली नव्हती. १५ दिवस झाले तरी गणेश हा घरी न आल्याने तसेच मामा दौंड यांना मोबाइलवर एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली, तसा संदेशही त्यांना आला. त्यामुळे दौंड यांनी शहर पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाची फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीनंतर पोलीस उपअधीक्षक राकेश ओला व निरीक्षक नितीन पगार यांनी मातापूर येथे भेट देऊन चौकशी केली. गणेश याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
गणेश हा घरातून बेपत्ता होण्यापूर्वी त्याने मित्रांकडून कपडे नेले होते. तसेच त्याने बारावीचा एक पेपरही दिला नव्हता. परीक्षा अवघड गेल्यामुळे तो घरातून निघून गेला असावा, असा अंदाज आहे. खंडणी मागणारा मेसेज त्याच्याच मोबाइलवरून आला होता. तसेच तो मुंबई येथे असल्याचे मोबाइलच्या लोकेशनवरून स्पष्ट झाले होते. आता त्याच्या शोधासाठी पथक मुंबईला जाणार आहे. पोलिसांनी खंडणी व पळवून नेल्याची शक्यता गृहीत धरूनही तपास सुरू केला आहे. दोन्ही दृष्टिकोनातून या घटनेचा तपास केला जात आहे.