पुणे : लैंगिक शोषणाविरोधात सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीने देशभर खळबळ माजवली असतानाच सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमध्येही (एससीएमसी) लैंगिक शोषण झाल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात समाजमाध्यमांवर लिहिले आहे. या प्रकारांबाबत तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विमाननगर येथील या महाविद्यालयातील १० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी ६ ऑक्टोबरपासून समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली.  एका माजी विद्यार्थिनीने तिच्या इंटर्नशिपदरम्यान झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात महाविद्यालयातील इंटर्नशिप समन्वयकाकडे तक्रार केली असता, तिची इंटर्नशिप थांबवण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.

दरम्यान, विनिता नंदा आणि संध्या मृदुल यांच्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका महिलेने ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला, तर तमिळ गीतकार वैरामुथु यांच्यावर गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी लैंगिक छळाचा आरोप केला. लेखक सुहेल सेठ यांनाही एका महिलेने ‘लाळघोटय़ा’ (क्रीप) असे म्हणत लैंगिक छळाचा आरोप केला आहे. चंदेरी दुनियेतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी लैंगिक छळ किंवा लैंगिक गैरवर्तवणूक केल्याच्या तक्रारी करण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिला पुढे आल्या आहेत.