यंदा पाऊस कमी झाल्यामुळे व पावसाळा आटोपल्यावर अवकाळी पावसाने उभी पिके नष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या त्या पाश्र्वभूमीवर शासनाने जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे शिवधनुष्य उचलले असून त्या अंतर्गत धडक सिंचन विहिरींची कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांच्या आढावा बठकीत दिले.
जिल्ह्य़ात धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ३२४ विहिरींची कामे व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ११८८ विहिरींची, अशी एकूण १५०३ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेला दिले आहेत. यासाठी लाभार्थ्यांच्या सभा घेऊन मजुरांच्या कामाचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देशही राजूरकर यांनी दिले.अनेक ठिकाणी मजुरांऐवजी मशिनने काम करून घेतले जाते व नकली मजूर नोंदवही तयार केली जाते, अशी माहिती आहे, पण सरकारी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, असे आरोप होत आहेत. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत केलेल्या कामांचा आढावा व प्रगतीचा अहवाल यावेळी घेण्यात आला.
जिल्ह्य़ातील २०० गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली. या योजनेचा प्रारंभ गणराज्य दिनी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या हस्ते आपातापा येथून करण्यात आली. या २०० गावांमधील ९२ ठिकाणी एकाच वेळी ही सुरुवात करण्यात आली. यात ढाळीचे बांध, शेततळी, सिमेंट नाला, बांध खोलीकरण व बांधकामे, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती आणि तलावातून गाळ काढणे आदी कामांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले. ही महत्वाकांक्षी योजना व टंचाईमुक्त महाराष्ट्र-२०२९ पर्यंत करायचा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे निर्देश आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिले.