scorecardresearch

सुरश्री संगीत महोत्सवाची बासरीवादनाने सांगता

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या सुरश्री संगीत महोत्सवाचा अंतिम दिवस सुचिस्मिता आणि देबोप्रिया चटर्जी या बंगाली भगिनींच्या बासरीवादनाने बहारदार ठरला.

संगीत महोत्सवात बासरीवादन करीत असताना चटर्जी भगिनी.

सांगली : सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या सुरश्री संगीत महोत्सवाचा अंतिम दिवस सुचिस्मिता आणि देबोप्रिया चटर्जी या बंगाली भगिनींच्या बासरीवादनाने बहारदार ठरला. बासरीच्या सुरांना बनारस घराण्याचे तबलावादक पं. किशन महाराज यांचे शिष्य कालीनाथ मिश्रा यांची मिळालेली साथ अतुलनीय ठरली.

मिलेनियम फौंडेशन व चितळे उद्योग समूह यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाची सांगता रविवारी रात्री झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली कला सादर केलेल्या या सुचिस्मिता व देबोप्रिया चटर्जी या भगिनींचा बासरीवादनाची जुगलबंदी रसिकांना मेजवाणी ठरली. चटर्जी भगिनींनी आपल्या बासरी सहवादनाची सुरुवात जयजयवंती रागाने केली. सुरुवातीच्या आलापीची पेशकश कहरवा तालात केल्यानंतर मध्यलय रुपकमध्ये बहारदार बंदीश सादर करून रंगत आणली. द्रुत त्रितालामधे विस्तार करून बासरी – तबला जुगलबंदीने जयजयवंतीची सांगता केली. रूपक आणि त्रितालातील रचनांना उपस्थित श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. चटर्जी भगिनींनी आपल्या बासरी सहवादनाचा शेवट बहारदार फागुन के दिन चार रे खेलो होरी या दादरा तालात निबध्द धुनने केला. विशेष म्हणजे त्यांनी ही होरी पहिल्यांदाच मंचावर सादर केली.  

अंतिम सत्रामध्ये मंजुषा कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी विलंबित एकतालात निबध्द कौन गत भयी पिया या राग बागेश्रीतील बंदिशीने गायनाचा प्रारंभ केला. श्रीरंगा कमलाकान्ता, बाई माझा कृष्ण देखिला, देवा आदि देवा पांडुरंगा आदी झपतालातील अभंग सादर केले. अरूंधती पटवर्धन यांनी भरतनाटय़म नृत्याविष्कार पेश केला.

पं. कालीनाथ मिश्रा यांची बनारस घराणेदार शैलीत संयत, दमदार, भरीव आणि पुरक तबला साथ यामुळे चटर्जी भगिनींनीच्या बासरी वादनात विशेष रंगत आणली. आलापीला पं. कालीनाथ मिश्रा यांनी कहरवाचे नुसत्या डग्ग्यावरील वादन शैलीत साथ करीत आपले वेगळेपण दाखवून दिले.

या महोत्सवाच्या अंतिम दिवसाचे निवेदन सुप्रसिद्ध व लोकप्रिय निवेदिका चित्रा खरे यांनी केले. यावेळी प्रायोजक मिलेनियम होंडाचे निखिल पाटील, उगार शुगर वर्क्‍सच्या गीताली आणि गौरी शिरगावकर,  श्री. ए. बी . इंग्लिश स्कूलचे विश्वस्त उदय पाटील तसेच अरुण दांडेकर, कलाकार समन्वयक बाळासाहेब मिरजकर, डॉ. दिलीप शिंदे,  लट्ठे  सोसायटीचे चेअरमन शांतिनाथ कांते आदी मान्यवर उपस्थित होते. संगीत सभेचे आयोजन सुरेश पाटील, श्रीपाद चितळे यांनी बाळासाहेब मिरजकर यांच्या मदतीने केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Concludes flute playing surashree music festival incomparable ysh

ताज्या बातम्या