scorecardresearch

महामार्गाच्या रखडपट्टीनंतर आता काँक्रीटीकरण; बारा वर्षांनंतर पळस्पे ते इंदापूर मार्गाचे काम अपूर्णच

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर मार्गाचे आता काँक्रीटीकरण केले जाणार आहे.

हर्षद कशाळकर

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर मार्गाचे आता काँक्रीटीकरण केले जाणार आहे. यासाठी साडेसातशे कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. बारा वर्षांपासून या टप्प्यात महामार्गाची रखडपट्टी सुरू आहे. आता तरी यातून कोकणवासीयांची सुटका होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२०१० मध्ये मुंबई गोवा माहामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेतून रस्त्याचे काम २०११ मध्ये  प्रत्यक्ष सुरू झाले. हे काम बारा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. दरवर्षी पावसाळय़ात होणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोकणातील प्रवाशांचे हाल होत आहेत.   ही बाब लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे उर्वरित इंदापूर ते झारापप्रमाणे काँक्रीटीकरण करावे अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी पळस्पे ते इंदापूर या मार्गाच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी दिली आहे. यासाठी साडेसातशे कोटी रुपयांचा निधी  केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात कासू ते इंदापूर या ४२ किलोमीटर मार्गाचे काँक्रीटीकरण होणार असून त्यासाठी ४४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यावर लागलीच सुरू होणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुकर होण्याची अपेक्षा आहे.

आजची स्थिती..

   महामार्गाच्या पळस्पे ते वडखळ मार्गाचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र वडखळ ते इंदापूर दरम्यान रस्त्याचे काम जवळपास ठप्प झाले आहे. नागोठणे ते वाकण फाटादरम्यान रस्त्याची दुरवस्था कायम आहे. कोलाड परिसरात रस्त्याची कामे झालेली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा पुन्हा एकदा अतिक्रमणे झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर येथे रस्ता रुंदीकरण झाले नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास खडतर ठरत आहे. 

कोर्ट कमिशनरचा अहवाल

पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. माणगाव ते पोलादपूर मार्गाची परिस्थिती फारशी चांगली नाही. महामार्गावर वाहतूक सूचना फलक बसविण्यात आलेले नाही, रस्त्यावर व्हायब्रेशन्स जाणवत आहेत. खड्डे योग्य प्रकारे भरण्यात आलेले नाहीत. सव्‍‌र्हिस रोडची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. रस्त्याचे क्युअिरग योग्य प्रकारे न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करणे आवश्यक आहे, असा अहवाल कोर्ट कमिशन यांनी न्यायालयाला सादर केला आहे.

प्रकल्प रखडण्याची कारणे..

   पळस्पे ते इंदापूर या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी हा रस्ता डांबरीकरणातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चरला हे काम देण्यात आले होते. सुरुवातीला भूसंपादनातील अडचणीमुळे कामाला उशीर झाला. नंतर कर्नाळा अभयारण्यातून महामार्ग जात असल्याने पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी काम थांबवावे लागले. नंतर ठेकेदार कंपनी दिवाळखोरीत निघाली. बँकानी पतपुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे दुसरम ठेकेदार घेऊन काम करून घेण्याची वेळ आली. यासारख्या कारणांमुळे प्रकल्पाचे काम रखडले. या प्रकल्पासाठी २७५ हेक्टर जागा संपादित करण्यात येणार होती. २०१० मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली ती अजूनही पूर्ण झाली नसल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. 

या प्रकल्पाने मला आणि कोकणवासीयांना खूप त्रास दिला आहे. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पण अठरा हजार कोटींच्या या प्रकल्पातील ११ पैकी ९ टप्प्यांच्या कामांना गती मिळाली आहे. उर्वरित दोन टप्प्यातील अडचणी होत्या त्यांचे निराकरण झाले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

पावसाळय़ात दरवर्षी पळस्पे ते इंदापूर मार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था होत होती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे इंदापूर ते झारापप्रमाणे पळस्पे ते इंदापूर मार्गाचे काँक्रीटीकरण करावे अशी विनंती मी केली होती. आता हे काम सुरू होत असल्याने कामाला गती मिळू शकेल. हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा सुरू राहील. इंदापूर, माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामेही तातडीने सुरू  व्हावीत अशी अपेक्षा आहे.

 – सुनील तटकरे, खासदार

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Concreting highway pavers twelve years later work palaspe indapur still incomplete ysh