सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर पक्षांतर्गत धुसफूस उफाळून आली. पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांची छबी मेळाव्यात व्यासपीठावरील पोस्टरवर लावली नसल्याच्या तात्कालिक कारणावरून गोंधळ झाला. दुपारी मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर व जिल्हा संवाद मेळावा आयोजिला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, पक्षाचे निरीक्षक शेखर माने आदींच्या उपस्थितीत झालेल्या या संवाद मेळाव्यात विसंवाद घडला. आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते. परंतु पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश साठे यांनी, पक्षात निष्ठावंतांची उपेक्षा होते, निष्ठावंतांना डावलले जात असेल तर पक्षात कशासाठी राहायचे, असा सवाल उपस्थित केला. पक्षात मंगल नसून तर दंगल दिसते, अशी टीकाही त्यांनी केली. त्यावरून गोंधळ उडाला. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी असंतुष्ट महेश माने यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा - शिवरायांची वाघनखे मिळविलेली नाहीत, गुप्ततेत अन् भाड्यानेच आणली, जयंत पाटील यांचा टोला हेही वाचा - मनोरमा खेडकर ‘या’ हॉटेलमध्ये ‘इंदुबाई’ बनून लपल्या होत्या, अटक टाळण्यासाठी केला खोटेपणाच! तथापि, मेळाव्यानंतर सभागृहाबाहेर पुन्हा गोंधळ झाला. महेश माने यांनी वाद घातला असता जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी त्यांना खडे बोल सुनावले.महेश माने हे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. पक्षात निष्ठावंतांपेक्षा भाजपशी जवळीक असलेल्या मंडळींना स्थान दिले जाते. आपणास शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी प्रस्ताव आला होता. परंतु आपण पक्षातच कायम राहण्याची भूमिका घेऊन पुन्हा घुसमट होत आहे, अशा शब्दांत महेश माने यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेवर भाष्य करताना, पक्षात कसलीही दंगल नाही. सर्व मंगलच आहे, असा दावा केला.