राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि चतुर्थ वर्गातील कामगार अशा वेगवेगळ्या दोन आंदोलनांमुळे महानगरपालिकेत शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. मोकाट जनावरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जनावरे थेट मनपा आयुक्तांच्या कक्षाबाहेरच आणून बांधले, तर झाडू कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासांठी मनपा कार्यालय दणाणून सोडतानाच कामबंद आंदोलन केल्याने शहरातील सफाईची कामे शुक्रवारी खोळंबली.
या आंदोलकांना मनपा आयुक्त अशोक ढगे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ती मागे घेण्यात आली. मात्र दोन्ही आंदोलनांमुळे मनपा मुख्यालयात एकच गोंधळ उडाला, कर्मचा-यांचीही चांगलीच पळापळ झाली. अखेर पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणावी लागली.
मनपातील सफाई कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन करून मनपा आवारातच निदर्शने सुरू केली. काही वेळातच त्यांनी हा परिसर दणाणून सोडला. झाडू कामगारांना वेळेवर योग्य दर्जाचे साहित्य दिले जात नाही, ही कमतरता असतानाच सफाईसाठी कामगारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास बालगुडे यांनी महिला कामगाराला अवमानकारक शब्द वापरले, अशा तक्रारी या कामगारांनी केल्या. त्यासाठी त्यांनी लगेचच निदर्शने करून कामबंद आंदोलनही सुरू केले. आयुक्तांनी चर्चा करूनही यात मार्ग निघत नव्हता.
मनपा मुख्यालयात हा गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जनावरे घेऊन मनपा कार्यालयात शिरले. शहरातील मोकाट जनावरांचा योग्य बंदोबस्त करा, या मागणीकडे वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केले. गायी, बैल घेऊनच हे कार्यकर्ते मनपा इमारतीत शिरल्याने आधीच्या गोंधळात आणखीनच भर पडली. या कार्यकर्त्यांनी थेट आयुक्तांच्या दालनाबाहेरच जनावरांसह ठिय्या दिल्याने कर्मचा-यांची चांगलीच धावपळ झाली. या जनावरांनी येथे घाणही केली. अखेर आश्वासनानंतरच हेही आंदोलन मागे घेण्यात आले.