काँग्रेसच्या बैठकीत सोमवारी टाकळीभानच्या दोघा प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व पकडापकडी झाली. तसेच आमदार भाऊसाहेब कांबळे यांना लक्ष्य करून कार्यपद्धतीबद्दल जाब विचारण्यात आला. तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी मुख्यमंत्री, काँग्रेसचे मंत्री व सरकारवरच नाराजी व्यक्त केली. ही बैठक अनेक कारणांमुळे गाजली.
सुयोग मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक पार पडली. या वेळी आमदार कांबळे, सभापती दीपक पटारे, माजी सभापती नानासाहेब पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत माजी सभापती पवार व भाऊसाहेब दाभाडे यांच्यात टाकळीभान ग्रामपंचायतीच्या राजकारणावरून वाद झाला. त्यात शिवाजी धुमाळ सामील झाले. पवार, धुमाळ हे दाभाडे यांच्यावर धावून गेले. त्यांच्यात धराधरी झाली. सभापती पटारे व राधाकृष्ण आहेर यांनी दोघांना धरले. बैठकीत फंड, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, राजेंद्र पाऊलबुद्धे, मुरली राऊत, भाऊसाहेब पारखे यांनी कांबळे यांच्या कार्यपद्धतीबद्दल टीका केली. शहरात मी काही पाहात नाही, ग्रामीण भागात काम करतो. शहरात ससाणे यांचे नेतृत्व सक्षम आहे, असा खुलासा त्यांनी केला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी जवळीक साधल्याबद्दल या वेळी टीका करण्यात आली.
माजी आमदार ससाणे यांनी विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना आमदारांची कामे होत. आता तसे होत नाही, अधिकारी मुजोर झाले आहेत. आमदारांना जुमानत नाहीत. महामंडळांवर नेमणुका झालेल्या नाहीत, शिर्डी संस्थान, महामंडळे याचे काही झाले नाही. मग काय करणार, असा सवाल केला. त्यांच्या नाराजीमुळे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. डॉ. दिलीप शिरसाठ यांनी पक्ष बदलण्याचा सल्ला दिला. पण ससाणे यांनी हा विषय घेऊ नका, असे त्यांना सुनावले. सभापती पटारे यांनी मात्र आमदार कांबळे यांची पाठराखण केली. या वेळी निवृत्ती बडाख, दत्तात्रय सानप, राजेंद्र म्हंकाळे, अंजूम शेख, जलीलभाई पठाण, मुक्तार शाह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.