अहिल्यानगर : कार्यकर्त्यांशी चर्चा करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष यांच्या निवडी केल्या जातील, असे पक्षाचे निरीक्षक तथा ओडीसाचे माजीमंत्री शरद राऊट यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘संघटन सृजन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून नवीन पदाधिकारी निवडीची चाचपणी करण्यासाठी पक्ष निरीक्षक राऊट अहिल्यानगरमध्ये आले आहेत. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अभियानचे समन्वयक माजी आमदार मुजफ्फर हुसेन, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, प्रताप शेळके, फिरोज खान, बाळासाहेब भंडारी, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाने देशभर संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियान सुरू केले आहे, अनेक पदाधिकारी अनेक वर्ष पदावर ठाण मांडून बसले आहेत. ज्यांचे काम योग्य नाही, जेथे रिक्त जागा आहेत तेथे बदल केले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार तरुण, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. गाव पातळीपर्यंत हे बदल केले जाणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. नेत्यांशी चर्चा केली जाईल. याचा अहवाल १९ एप्रिलपर्यंत अखिल भारतीय समितीकडे सोपवला जाईल. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन नियुक्ती होतील असेही निरीक्षक राऊट यांनी सांगितले.
या अभिनयाच्या हा सध्या सातवा टप्पा सुरू आहे. इतर राज्यात यापूर्वीच अभियान राबवले गेले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, त्यामुळे हे अभियान आता राबवले जात आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तींसाठी पक्षश्रेष्ठींकडे ६ नावे पाठवली जाणार आहेत. त्यात एक महिला, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, एक इतर मागासवर्गीय यासाठी राखीव ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभर नव्याने संघटना उभारणीवर भर दिला, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेद्वारे लाखो लोक पक्षाशी जोडले गेले होते. त्याचप्रमाणे या अभियानातून नव्याने पक्षबांधणी केली जाणार असल्याचे राऊट यांनी सांगितले.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अभियानचे समन्वयक मुजफ्फर हुसेन यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले आज अनेकजण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले असले तरी त्यामुळे खरी भाजप कोणती हे शोधण्याची वेळ आली आहे. मात्र काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
