बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि महाआघाडी यांना यश मिळू शकलेलं नाही. १०० ची संख्याही महाआघाडीला गाठता आलेली नाही. एनडीएने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली आहे. काँग्रेस जागा वाटप करताना जास्त जागा मागते पण निकालात विजयी जागा मिळत नाहीत असं दानवे यांनी म्हटलं आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

पराभव झाला आहे हे मान्य केलं पाहिजे. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी लावलेला वेळ हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांचं जे जागावाटप झालं त्यात अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी पर्यंत चाललं होतं. राहुल गांधींची जी मतचोरीबाबतची यात्रा होती तिला मिळालेला प्रतिसाद पाहून तेजस्वी यादव यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणं फायद्याचं ठरलं असतं. पण ही चूक त्यावेळी केली आहे. फक्त एवढंच नाही पण काँग्रेस, तेजस्वी यादव यांचा पक्ष कमी पडला हे मान्य केलं पाहिजे. बाकीचे मुद्दे आहेतच पण हे लक्षात घेतलं पाहिजे.

काँग्रेस जास्त जागा हव्या असतात पण निकालात विजयाचं प्रमाण कमी असतं-दानवे

काँग्रेसला दुहेरी संख्याही गाठता आलेली नाही असं विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, काँग्रेसचं असंच आहे जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा, मोठा वाटा हवा असतो. प्रत्यक्षात विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. नगरपालिका आणि इतर विषयही आम्ही बोलतो. काँग्रेसच्या मानसिकतेमुळे इतर पक्षांचं नुकसान होतं असं माझं मत आहे. जागावाटपाच्या बाबतीत काँग्रेस काय वागते ती मी सांगितलं. बिहारची गणितं आणि महाराष्ट्राची गणितं स्वतंत्र असतात असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेससह जाण्याची आमची इच्छा आहे-अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष यांच्याबरोबर जाण्याची आमची इच्छा आहे. पण छोट्या गावांमध्येही जर जागावाटपाची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असेल तर निवडणुकीतली मजा निघून जाते. मला वाटतं की निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे तो या धोरणामुळे मिळत नाही आणि त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होतो.

जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नसायला पाहिजे-अंबादास दानवे

जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नसला पाहिजे. काँग्रेसवाले ही जागा द्या, ती जागा द्या, आमच्या कार्यकर्त्यांना फोन करुन पंजावर लढा सांगतात. हे काही योग्य नाही. महाराष्ट्राची निवडणूक असताना खूप आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं असतं आणि जागा वाटप आधी केलं असतं तर परिणाम वेगळे दिसले असते. जी चूक महाराष्ट्रात काँग्रेसने केली ती चूक बिहारमध्ये केली आहे असं माझं मत आहे असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने या वृत्तीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. एबीपी माझाशी बोलत असताना अंबादास दानवे यांनी ही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.