मनपा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडीच व्हावी- आदिक

काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये एकटय़ाने लढण्याची सध्या ताकद नाही, देशातील परिस्थितीच अशी आहे की दोन्ही पक्ष एकटय़ाने लढू शकणार नाहीत, त्यामुळे नगरच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करावी, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आज केली.

काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये एकटय़ाने लढण्याची सध्या ताकद नाही, देशातील परिस्थितीच अशी आहे की दोन्ही पक्ष एकटय़ाने लढू शकणार नाहीत, त्यामुळे नगरच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करावी, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आज केली.
आदिक यांच्या उपस्थितीत त्यांच्या दोन्ही काँग्रेसमधील समर्थकांचा बहुद्देशीय मेळावा शुक्रवारी दुपारी नगर क्लबमध्ये झाला. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, आमदार अरुण जगताप, मेळाव्याचे निमंत्रक दादा कळमकर आदी या वेळी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी मेळाव्यास काही वेळच हजेरी लावली, मात्र त्यांचे चिरंजीव माजी महापौर संग्राम जगताप मेळाव्यास पूर्ण वेळ उपस्थित होते.
मनपाची निवडणूक ही प्रयोगशाळा आहे, हे पाऊल दोन्ही पक्षांनी व्यवस्थित टाकले तरच पुढे राज्यात व केंद्रात यश मिळेल. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षीय अभिनिवेश न ठेवता ‘क्रेडिट’चा मुद्दा न करता एकत्र निवडणूक लढवावी, राज्य व केंद्र सरकारने गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले नाहीत, इतके चांगले निर्णय गेल्या चार वर्षांत घेतले तरीही देशातील परिस्थिती सोपी राहिलेली नाही, असा इशारा आदिक यांनी दिला. संग्राम जगताप यांना ताकद देण्याचेही आवाहन त्यांनी केले.
नगर शहराला संरक्षणाची नाहीतर ख-या अर्थाने विकासाचीच गरज आहे, असे स्पष्ट करताना पाचपुते यांनी शहराच्या विकासाआड शहराचाच लोकप्रतिनिधी येत असल्याचा टोला लगावला.

शहरात कोणी तलवार घेऊन फिरत नाही की कोणी खून करत फिरत नाही, मग संरक्षणाची आवश्यकताच काय, असा प्रश्न उपस्थित करून पाचपुते म्हणाले, नगरच्या लोकांना वाटत नाही का विकास व्हावा, शहर आहे तसेच ठेवण्याचा प्रयत्न आमदार करतात तरीही पाच वेळा विजयी होतात, याला कारण आपण सक्षम पर्याय न देता भांडत बसतो. दोन्ही पक्षांत सर्वजण स्वत:चा स्वार्थ पाहतात, आघाडी किंवा पक्षाचा स्वार्थ कोणी पाहात नाही. केवळ एक उड्डाणपुलाचा प्रश्न सोडला तर पाणी योजनेसाठी ११६ कोटी रुपये दिले, भुयारी गटार योजना मंजूर केली, सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी पैसा दिला, तो वाया घालवला, नाटय़गृह व अतिक्रमणे हटवतानाही लोकप्रतिनिधीच आडवे पडतात हे आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.
कळमकर म्हणाले, आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेतील. आघाडी करताना दोन्ही पक्षांनी फार अवास्तव मागण्या करू नयेत, नाहीतर स्वतंत्र लढून नंतर एकत्र यावे. आपल्या भांडणात युतीचा फायदा होतो. संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी पक्षनिरीक्षकांच्या बैठकीत बहुतेकांनी आघाडी करण्यास अनुकूलता दाखवली. परंतु चार महिन्यांपूर्वी श्रेष्ठींनी स्वबळावर तयारी करण्यास सांगितले होते, त्यामुळे आघाडी करायची की नाही, हे प्रथम स्पष्ट झाले पाहिजे, असे सांगितले. शहराचे चित्र बदलण्यासाठी तेच तेच उमेदवार देण्याऐवजी नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, काही प्रतिष्ठित लोकांना जाणीवपूर्वक उमेदवारी दिली जावी, अशी सूचना केली. राजेंद्र फाळके, संपत मेमाणे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. मेधा कांबळे आदींची भाषणे झाली.
 काँग्रेस पदाधिका-यांची हजेरी
राष्ट्रवादीच्या मेळाव्यास काँग्रेसमधील आदिक समर्थक विनायक देशमुख, डी. एम. कांबळे, उबेद शेख आदी उपस्थित होते. काँग्रेसची शहरात चांगली अवस्था नसताना स्वबळाची भाषा कशाच्या जोरावर केली जाते, याचे आश्चर्य वाटते, असा प्रश्न उपस्थित करून देशमुख म्हणाले, की दोन्ही काँग्रेस एकमेकांची स्पर्धक नाहीतर खरी स्पर्धक युती आहे, हे लक्षात घेऊन आघाडी केली पाहिजे. कांबळे यांनीही मनसेमुळे सेनेच्या आमदाराची ही शेवटचीच निवडणूक असेल, त्यामुळे दोन्ही काँग्रेसने एकत्रच निवडणूक लढवावी, असे सांगितले. शेख यांनीही आघाडीचा निर्णय श्रेष्ठींनी लवकर घ्यावा, असे आवाहन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress and ncp should be front in mnc election adik