अहिल्यानगर : प्रदेश काँग्रेसने जिल्ह्यातील काही रिक्त जागांवर तालुकाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती केली. मात्र, या नियुक्त्यांमधून शहर जिल्हाध्यक्षपद वगळले आहे. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती पुन्हा लांबणीवर पडली आहे.सप्रदेश काँग्रेसने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संमतीने संगमनेर तालुकाध्यक्षपदी अजय फटांगरे, कोपरगाव तालुकाध्यक्षपदी नितीन शिंदे व भिंगार ब्लॉक अध्यक्षपदी रिजवान शेख यांची नियुक्ती जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) जयंत वाघ यांनी दिली. याच वेळी शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्तीही प्रतीक्षेत होती. मात्र, ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नगर शहराबरोबरच श्रीगोंदे, नेवासे तालुकाध्यक्षपदाची नियुक्तीही प्रलंबित आहे.
सत्ता गेल्यानंतर जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या जिल्हा काँग्रेस संघटनेची पुनर्बांधणी ज्येष्ठ नेते थोरात व जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी सुरुवात केली. त्यासाठी तालुकानिहाय दौरेही आयोजित केले. मात्र, हे दौरे अपूर्णच राहिले आहेत. जिल्हा काँग्रेसमध्ये विखे व थोरात हे दोन गट अस्तित्वात असताना पक्ष अधिक मजबूत होता. पक्ष कार्यकर्त्यांचे जिल्हाभर जाळे होते. संघटनाही मजबूत होती. राधाकृष्ण विखे यांनी पक्ष सोडताना त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारीही भाजपमध्ये गेले. त्यानंतर जिल्ह्यात पक्ष संघटनेची एकहाती धुरा माजी मंत्री थोरात यांच्यावर पडली. थोरात यांनी नियुक्त केलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, किरण काळे या पदाधिकाऱ्यांनी लागोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष पदासह तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्षांची पदे रिक्त आहेत. त्यावर नियुक्त केल्या जाणार असल्याचे सांगत थोरात, वाघ व पक्ष निरीक्षक शरद आहेर यांनी जिल्हा दौरा केला. मात्र, तो अपूर्णच राहिला.
शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, काही जण त्यास अनुपस्थित राहिले. त्यामुळे या मुलाखती पुन्हा प्रदेश पातळीवर आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली. परिणामी शहर जिल्हाध्यक्षासह श्रीगोंदे व नेवासे तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या नाहीत.
लवकरच नियुक्ती
या संदर्भात जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) जयंत वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शहर जिल्हाध्यक्षपदी लवकरच सक्षम कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाईल, यासह इतर रिक्त पदांवरील नियुक्तीसाठी माजी मंत्री थोरात, आमदार हेमंत ओगले यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.