आधी काँग्रेस, मग भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने देशमुख यांच्यावर ही कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. ते वक्तव्य देशमुख यांच्या अंगलट आलं आहे.
दरम्यान, काँग्रेसने बडतर्फ केल्यानंतर आशिष देशमुख पुन्हा भाजपामध्ये जाणार अशी चर्चा रंगली आहे. याबाबत देशमुख् यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. टीव्ही ९ मराठीने शुक्रवारी (२६ मे) देशमुख यांच्याशी बातचित केली. यावेळी देशमुख यांना विचारण्यात आलं की, काँग्रेसने बडतर्फ केल्यानंतर आता तुमची पुढची भूमिका काय? लोकही वाट पाहत आहेत की, आशिष देशमुख काय निर्णय घेणार? यावर देशमुख म्हणाले, मागच्या शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्या घरी नाश्त्याला आले होते. तेव्हापासून मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मीडियानेच हे पेव उठवलं आहे.
हे ही वाचा >> “२०२४ मध्ये मोदींचं सरकार येईल आणि आपण…”, खासदार कुमार केतकरांनी काँग्रेसच्या लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले
आशिष देशमुख म्हणाले, मला काँग्रेसमधून काढून टाकलं जाईल अशी अपेक्षा नव्हती. परंतु आता मी लोकांशी बोलून, कार्यकर्त्यांशी बोलून, जनतेचा कौल पाहून मी पुढचा निर्णय घेईन. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मी थोड्या मतांनी हरलो. २०१४ मध्ये मी राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा पराभव केला. २०१९ मध्ये मी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांना कडवी झुंज दिली. आता मी जनतेशी बोलून माझी राजकीय भूमिका ठरवेन. संपूर्ण विदर्भाचं व्यापक हित डोळ्यासमोऱ ठेवून मी निर्णय घेईन.