दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, दलित पँथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांच्या निधनामुळे अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करणारा लढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड गेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे आज पहाटे निधन झाले. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मदतीने केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजा ढाले गटाचे प्रमुख होते.

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले काळाच्या पडद्याआड

ढाले यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, “sते एक लढवय्ये नेते होते. आयुष्यभर त्यांनी अन्यायाविरोधात संघर्ष केला. आक्रमक बाणा, परखड विचार आणि विचारधारेवर असलेल्या प्रगाढ विश्वासामुळे ते एक अतिशय लोकप्रिय नेते व लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते”.

सामाजिक चळवळीसोबतच साहित्य क्षेत्रातही राजा ढाले यांचे मोठे योगदान होते. ते एक उत्तम साहित्यिक, व्यासंगी अभ्यासक आणि फर्डे वक्ते होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झाली असून, ते कायम लाखो कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहतील, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी राजा ढाले यांना श्रद्धांजली अर्पण केली.