पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले कन्हैया कुमार पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील काँग्रेस भवनात पक्षाच्या सदस्यांना त्यांनी संबोधित केले. १७व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ते सहभागी झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस, क्रिकेट आणि चित्रपट या तीन गोष्टींबाबत भारतात सगळेच तज्ञ आहेत असे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे.

“काँग्रेस, क्रिकेट आणि चित्रपट या तीन अशा गोष्टी आहेत ज्याबाबत भारतात सगळेच तज्ञ आहेत. कोणालाही विचारा काँग्रेस इतका सोपा पक्ष आहे की त्याबाबत सर्व तज्ञ आहेत. काँग्रेस पक्ष एकदम उघडलेले पुस्तक आहे. ज्यांना वाचता येते ते वाचतात आणि ज्यांना नाही येत ते त्याची पाने फाडतात. कोणतीही गोष्ट लपलेली नाही. तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की जेव्हा कमकुवत असण्याबद्दल बोलता तेव्हा असलेल्या शक्तीबद्दलही बोलायला हवे. भारतात मध्यम मार्ग हा उत्तम मार्ग आहे. या देशामध्ये अतिवादी विचारांना नाकारून मध्यम मार्गावर चालण्याचा प्रयत्न फक्त काँग्रेस करत आहे,” असे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे.

देशातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या विषयावरील कार्यक्रम बोलतान कन्हैय्या कुमार यांनी अनेक मुद्द्यांवर यावेळी भाष्य केले. अभिनेत्री कंगना राणावतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी प्रतिक्रिया दिली. “स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत. म्हणून माझं एक आहे की मी अशा प्रकारच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझं माध्यमांना सांगणं आहे की तुम्हीही दुर्लक्ष करा”, असा टोला कन्हैय्या कुमार यांनी लगावला.